कोल्हापूर : संयुक्त कुष्ठरोग अभियान जिल्ह्यात १० ते २५ आॅक्टोबर दरम्यान राबविण्यात येत आहे. या अभियान काळात जिल्ह्यातील ३४ लाख १७ हजार लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी येथे दिली.संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान, सक्रिय क्षयरोग शोध मोहीम आणि असंसर्गिक रुग्णप्रतिबंधक जागरूकता अभियानाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, कुष्ठरोग विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. प्रकाश पाटील, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनिषा कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. स्मिता खंदारे, आदी उपस्थित होते.संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान, सक्रिय क्षयरोग शोध मोहीम आणि असंसर्गिक रुग्ण प्रतिबंधक जागरूकता अभियान राबविण्यात येत असून, या कालावधीत शोध पथकाद्वारे ग्रामीण भागातील १०० टक्के म्हणजे ३० लाख ६२ हजार ३३९, तर शहरी भागातील ३० टक्के म्हणजे तीन लाख ५४ हजार ९६७ इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
या अभियानासाठी जिल्हा स्तरावर दोन हजार ६५५ पथके तयार करण्यात येत आहेत. याबरोबरच दुर्गम भाग, विट भट्टी, बांधकामे, कारागृह, आश्रमशाळा, खाण कामगार, विणकाम, कापडगिरणी कामगार इत्यादी भागांतील सर्वेक्षण करण्यासाठी खास पथके तयार करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.कशासाठी मोहीम ...समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकर शोधून त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. नवीन संसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करण्यावर भर दिला जाणार आहे, नवीन कुष्ठरुग्णांमध्ये विकृतीचे प्रमाण कमी करणे, समाजात कुष्ठरोगाविषयी जागृती करून कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न आहे; त्यासाठी खासगी डॉक्टर, तसेच स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे.