कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळ प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लवकरच बैठक घेण्याची तयारी नूतन केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी दर्शविली. खासदार संभाजीराजे यांनी त्यांंची दिल्लीत जाऊन भेट घेतली व मंत्री झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला.कोल्हापूर विमानतळावर नाइट लँडिंगची सुविधा सुरू करण्यात येणारे अडथळे जलद दूर करावेत, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली. लवकरच डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, भारतीय विमानतळ प्राधिकरण, कोल्हापूर विमानतळ प्रशासन, कोल्हापूरचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी व संबंधित विभागांचे प्रमुख यांच्यासोबत बैठक घेण्याची मागणी केली.
यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच अशी बैठक घेऊन सर्व विषय मार्गी लावू, असे आश्वासन मंत्रिमहोदयांनी दिले. कोल्हापूर विमानतळाचे ह्यछत्रपती राजाराम महाराज विमानतळह्ण असे नामकरण करण्याबाबतचा ठराव महाराष्ट्र सरकारने पुन्हा करून दिल्यास केंद्र शासन असे नामकरण करील, असेही मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.करवीर छत्रपती घराण्याशी ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. राजर्षी शाहू छत्रपती महाराज व ग्वाल्हेरचे महाराज श्रीमंत माधवराव शिंदे हे अत्यंत जवळचे मित्र होते. आजही छत्रपती घराण्याशी ग्वाल्हेरकर शिंदे घराण्याचे मैत्रीपूर्ण संबंध टिकून आहेत.
छत्रपती राजाराम महाराजांनी सुरू केलेल्या कोल्हापूर विमानतळास महाराजांचे नाव देण्याची मागणी संभाजीराजे यांनी यावेळी केली. महाराष्ट्र शासनाने २०१८ ला तसा ठराव करून प्रस्ताव दिला होता. मात्र, तसाच ठराव पुन्हा एकदा करून पाठविल्यास विमानतळास छत्रपती राजाराम महाराजांचे नाव देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.