कोल्हापूर : प्रदूषण नियंत्रणच्या नियमांचे उल्लंघन व बिगरशेतीचा परवाना नसल्याने टोप संभापूर (ता. हातकणंगले) येथील निकिता स्टोन क्रशर, श्रीराम स्टोन क्रशर, विजय स्टोन क्रशर, सुपरटेक रेडीमिक्स प्लांट रविवारी दुपारी जिल्हा खनिकर्म विभाग व हातकणंगले तहसीलदार कार्यालयाने धडक कारवाई करीत सील केले.टोप संभापूर परिसरातील स्टोन क्रशरमधून बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे औद्योगिक वसाहतीमधील कामगारांसह अन्य नागरिकांना त्रास होत आहे. या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा खनिकर्म कार्यालय, इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालय, हातकणंगले तहसीलदार कार्यालयाकडे तक्रारी दाखल होत्या.
त्या पार्श्वभूमीवर संबंधित स्टोन क्रशरचालकांना नोटीस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले होते; परंतु त्यांच्याकडून कोणताही समाधानकारक खुलासा देण्यात आला नाही. उलट या स्टोन क्रशरमधून बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे प्रदूषणात भरच पडत गेली. तसेच या स्टोन क्रशर चालकांकडे बिगरशेतीचेही परवाने नाहीत. तरीही बेकायदेशीररीत्या व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंंघन करीत क्रशर सुरूच ठेवले आहेत.त्यामुळे जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, हातकणंगलेचे तहसीलदार सुधाकर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वडगावचे मंडल अधिकारी गणेश बरगे यांच्या पथकाने रविवारी दुपारी टोप संभापूर येथील या चार क्रशरवर धडक कारवाई करीत ते सील केले. याबाबतचे आदेश संबंधित क्रशरवर चिकटविण्यात आले.कायदा माझे काय बिघडवितो? या आवेशात स्टोन क्रशर चालकांनी सर्वच नियमांची पायमल्ली केली आहे. दररोज उडणाऱ्या धुळीमुळे परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील कामगारांसह रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या धुळीमुळे पार्किंग केलेल्या दुचाकींसह चारचाकी वाहनांवर थरच्या थर साचून त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन खनिकर्म विभाग व हातकणंगले तहसीलदार कार्यालयाने संयुक्तरीत्या केलेल्या या धडक कारवाईचे स्वागत होत आहे.