कोल्हापूर : शिक्षण हक्क कायद्याची (राईट टू एज्युकेशन) देशातील इतर राज्यांत अंमलबजावणी होत असताना महाराष्ट्रात मात्र त्याची थट्टाच झाली आहे, अशी टीका महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी रविवारी येथे केली.शाहूपुरी, साईक्स एक्स्टेंशन येथील जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी हॉल येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या जिल्हा शाखेच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव, विजय देवणे, युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षल सुर्वे आदींची प्रमुख उपस्थिती होती.अभ्यंकर म्हणाले, गेल्या चार वर्षांत शिक्षकांची पदे सरकारने भरलेली नाहीत. उलट आताच्या सरकारने शिक्षकांची पदे अतिरिक्त झाल्याचे म्हटले आहे. त्याचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक व समाजाने पेटून उठून शिक्षकांच्या मागे राहण्याची गरज आहे. नाही तर शिक्षकांसह शिक्षण व्यवस्थेची वाताहत कोणीच रोखू शकणार नाही. २० पटाच्या आतील शाळा बंद केल्यास राज्यातील पाच हजार शिक्षकांची पदे धोक्यात येणार आहेत.शिक्षकांसह शिक्षण व्यवस्थेची अवस्था ब्रिटिशांसह कॉँग्रेसच्या कारकिर्दीबरोबरच आताही जशीच्या तशीच आहे असे सांगून अभ्यंकर म्हणाले, सध्या इंग्रजी शाळांचे फार मोठे अतिक्रमण मराठी शाळांवर झालेले आहे. शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था अद्याप शासन करू शकलेले नाही. शिक्षण हक्क कायद्यानुसार दोन वर्षांच्या मुलालाही शिक्षण घेण्याचा अधिकार असून, यासाठी प्रत्येक बालवाडीही शाळेला जोडली पाहिजे. (प्रतिनिधी)
शिक्षण हक्क कायद्याची महाराष्ट्रात थट्टा
By admin | Published: September 20, 2015 9:35 PM