सचिन भोसले / कोल्हापूर मेरा नाम जोकर, एक होता विदूषक अशा चित्रपटांतून त्याची दु:खं मांडली गेली; पण ‘हसविणारा तो’ एवढीच त्याची प्रतिमा लोकांच्या लक्षात राहिली. त्यामागील त्याची जळजळ मात्र कुणीच ध्यानात घेतली नाही... अशीच कहाणी आहे ‘जेमिनी सर्कस’मधील शिवकुमार भैया रामानंद या ९१ वर्षीय विदूषकाची. चित्रविचित्र पेहराव, रंगविलेला चेहरा आणि विचित्र, विनोदी हावभाव करणारा विदूषक सर्कसच्या रिंगणात आला की, पोट धरून हसावंच लागतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही चेष्टा करावी, अशी विदूषकाची प्रतिमा असते. सध्या ‘जेमिनी सर्कस’मध्ये ९१ वर्षीय शिवकुमार भैया रामानंद यांची स्थिती तर ‘मेरा नाम जोकर’मधील विदूषकासारखी झाली आहे. त्यांच्यामागे कुटुंबातील कोणीच नसल्याने जेमिनी सर्कस हेच त्यांचे घर झाले आहे. वयाच्या तिसाव्या वर्षी ते ‘जेमिनी’मध्ये दाखल झाले. प्रथम मिळेल ते आणि मालक सांगतील ते काम शिवकुमार करीत होते. यामध्ये दोर बांधणे, साहित्य उचलणे, गेटवर वॉचमन, मजूर अशी पडेल त्या कामांचा समावेश होता. ही कामे वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत त्यांनी केली. आता मात्र शरीर साथ देत नसल्याने त्यांना काम जमेनासे झाले आहे. ‘जेमिनी’च्या मालकांनी ते जोपर्यंत जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना जमेल ते काम द्या आणि आपल्याच सर्कसचा एक भाग आहेत म्हणून सांभाळा, असे व्यवस्थापनाला सांगितले आहे. त्यामुळे पहिली पन्नास वर्षे मजूर म्हणून काम करणारे शिवकुमार आता गेल्या दहा वर्षांपासून विदूषक म्हणून काम करीत आहेत. शिवकुमार आपल्या कामाबद्दल सांगताना म्हणाले, उत्तर प्रदेशातील बस्ती या गावात राहणारा मी. घरात अठराविश्वे दारिद्र्य असल्याने वयाच्या तेराव्या वर्षी मी घर सोडले. मिळेल ते काम केले. वयाच्या तिसाव्या वर्षी आमच्या शेजारील गावात ‘जेमिनी सर्कस’ आलेली. तेथे काम मिळते का म्हणून पाहण्यास गेलो. मला मजुराची नोकरी मिळाली व तब्बल साठ वर्षे जेमिनीशी एकनिष्ठ राहिलो आहे. गेली साठ वर्षे काम केल्यानंतर माझ्यामागे कोणीच नसल्याने मालकांनी ‘तू जिवंत असेपर्यंत तुला ‘जेमिनी’तून काढून टाकत नाही. जमेल ते काम कर,’ असे सांगितल्याने मी सर्कशीच्या रिंगणात गेली दहा वर्षे विदूषकाचे काम करतो आहे. सध्या सर्कशीच हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत राहिल्याने सर्कशीतील विदूषकांच्या हातांना काम नाही. केवळ तोंडाला रंग असेपर्यंतच आम्हा कलाकारांना किंमत असते. रंग उडून गेल्यानंतर समाजही आमच्याकडे पाठ फिरवितो, अशी खंत शिवकुमार यांनी व्यक्त केली.
कहता है जोकर सारा जमाना, आधी हकीकत..
By admin | Published: May 18, 2015 1:19 AM