प्रदीप शिंदे -- कोल्हापूर --पुढचे महायुद्ध पाण्यासाठी होईल, असे म्हटले जाते. वाढती लोकसंख्या, शहरीकरण यांच्या पाण्याच्या गरजा नैसर्गिक साधनसंपत्तीच्या आधारावर पूर्ण करणे सोेपे नाही. पाणीबचतीसाठी घराघरांमधून निर्माण होणारे सांडपाणी हादेखील एक पर्याय असू शकतो. या सांडपाण्यावर घरामध्ये पुनर्प्रक्रिया करून ते पाणी जमिनीत मुरविता येते, हे सरनोबतवाडी-मणेरमाळ मार्गावर राहणाऱ्या जोशी कुटुंबीयांनी करून दाखविले आहे. जिथे जिथे नागरी वस्त्या होतात तिथे सांडपाणी तयार होणे हे स्वाभाविकच असते. अंघोळ तसेच स्वयंपाकघरातून तयार होणाऱ्या, कपडे व भांडी घासून तयार होणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट लावणे हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. या सांडपाण्यावर साधी प्रक्रियाही केली जात नाही. ते जसेच्या तसे नदी-नाल्यांत, ओढ्यात सोडले जाते. त्यामुळे जलप्रदूषण वाढण्यास मदत होते. प्रत्येक घरामधील सांडपाण्यावर प्रक्रिया करणे हे शक्य आहे. असे केल्यास पाणीटंचाईच्या समस्येवर थोड्याफार प्रमाणात आपण मात करू शकतो. या गोष्टींचा विचार करून सरनोबतवाडी-मणेरमाळ या मार्गावर राहणारे अवधूत जोशी यांनी आपल्या घरामध्येच सांडपाणी जमिनीत मुरविण्यासाठी अत्यंत अल्प खर्चात उपाययोजना केली आहे. या उपाययोजनेमुळे दररोज सुमारे तीनशे लिटर सांडपाणी जमिनीत मुरविण्यात येते. या उपक्रमामुळे त्यांनी पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे.
दररोज तीनशे लिटर सांडपाणी जमिनीत मुरविणारे जोशी कुटुंब
By admin | Published: May 26, 2016 1:02 AM