जोतिबा : जोतिबा डोंगरावर रविवारी पाकाळणीचा पहिला रविवार मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला. हजारो भाविकांनी श्री जोतिबाचे दर्शन घेऊन गुलाल-खोबऱ्याची उधळण केली.जोतिबा चैत्र पौर्णिमा ते अमावस्या दरम्यान येणारे रविवार हे पाकाळणीचे रविवार म्हणून यात्रा जोतिबा डोंगरावर भरते. यावेळी पाकाळणीचे दोन रविवार आले आहेत. रविवारी पहिल्या पाकाळणी रविवाराला भाविकांची अलोट गर्दी होती. हजारो भाविकांनी ‘चांगभलं’च्या गजरात जोतिबा देवाचे दर्शन घेतले. सकाळी ११ वाजता जोतिबा मंदिर प्रदक्षिणेसाठी धुपारती सोहळा निघाला. भाविकांनी धुपारती सोहळ्यावर गुलाल-खोबऱ्याची उधळण केली. मंदिरा सभोवती चार-पाच दर्शनरांगा लागल्या होत्या. रात्री आठ वाजता जोतिबाचा पालखी सोहळा निघाला. तोफेच्या सलामीने पालखी सोहळ्याची सांगता झाली.जोतिबा मंदिरातील उत्तर दरवाजातून एकाचवेळी भाविक मंदिरात प्रवेश व बाहेर पडत होते. यावेळी येणाऱ्या-जाणाऱ्या भाविक ांमध्ये मोठी चेंगराचेंगरी होत होती. भाविकांना मोठी कसरत करीत मंदिरा प्रवेश करून बाहेर पडावे लागत होते. ‘लोकमत’ने याबाबत ‘उत्तर दरवाजाचा अरुंद रस्ता’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. उत्तर दरवाजामध्ये होणाऱ्या चेंगराचेंगरीचा प्रकार टाळण्यासाठी एकेरी मार्ग किंवा दुभाजक उभा करण्याचा उपाय सांगितला होता. अखेर मंदिर प्रशासनाने व पोलिस विभागाने हा चेंगराचेंगरीचा प्रकार टाळण्यासाठी लोखंडी दुभाजक उभा केले. आता मंदिरात प्रवेश करताना व बाहेर पडताना भाविकांची गर्दी व चेंगराचेंगरीवर नियंत्रण आले.रविवारी पाकाळणीच्या पहिल्या रविवार यात्रेला हा दुभाजक भाविकांना सोयीचा ठरला.
जोतिबावर पाकाळणी उत्साहात
By admin | Published: April 25, 2016 12:45 AM