जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर २१ एप्रिलला होणाऱ्या चैत्र यात्रा नियोजनाची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली जोतिबा येथील पोलिस चौकीमध्ये झाली. बैठकीत खोबऱ्याची वाटी उधळण्यावर व प्लास्टिक पिशवी वापरण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. १९ एप्रिलला यात्रा नियोजनाची रंगीत तालीम घेणार असल्याचे जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे यांनी सांगितले. जोतिबा चैत्र यात्रेत गुलाल, खोबरे मोठ्या प्रमाणात उधळण्यात येते. अखंड खोबऱ्याची वाटी पालखी व सासनकाठीवर उधळण्यात येते. यावेळी खोबरेवाटीचा जोराचा मार बसून भाविक व पोलिस कर्मचारी जखमी होतात. यावर उपाय म्हणून प्रशासनाने खोबऱ्याचे लहान लहान तुकडे करून ते पालखीवर उधळण्याचे आवाहन भाविकांना केले आहे. यात्रा काळात प्लास्टिकच्या वापरावरही निर्बंध घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी वीजरोधक अॅन्टिना, रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड, वैद्यकीय पथक तैनात करण्यात येणार आहे. अनिरुद्ध उपासना केंद्र, व्हाईट आर्मी, देवस्थानचे सुरक्षारक्षक, स्वयंसेवक दर्शन रांग व्यवस्थेसाठी असणार असल्याची माहिती कोडोली पोलिस स्टेशनचे स.पो.नि. शरद मेमाणे यांनी दिली. तात्पुरती शौचालये, क्रेन व्यवस्था, जनरेटर, मोफत बससेवा, सीसीटीव्ही कॅमेरे, मंदिर रंगकाम, अग्निशामक यंत्रणा, सुरक्षा व्यवस्था आदी कार्यासाठी पश्चिम देवस्थान समितीने २२ लाखांचा विकास आराखडा तयार केल्याची माहिती सचिव शुभांगी साठे यांनी दिली. जिल्ह्यातील नगरपालिका व कारखाना यांच्याकडून अग्निशामक गाडी व पाण्याचा टँक र पुरवठा होणार असल्याची माहिती पन्हाळ्याच्या गटविकास अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांनी दिली. शहर वाहतूक विभागाचे आर. आर. पाटील, विद्युत मंडळ, पाणीपुरवठा, आरोग्य विभाग, एस.टी. महामंडळ, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी यात्रेत देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती दिली. ग्रामस्थ, पुजारी यांच्या वतीने जयवंत शिंगे, आनंदा लादे, नवनाथ लादे यांनी स्थानिक मंदिरातील प्रश्न मांडले. या बैठकीला जि.प. कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे, चैतन्या एस., शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव, प्रांताधिकारी रवींद्र खाडे, पन्हाळा तहसीलदार रामचंद्र चोबे, सरपंच रिया सांगळे, उपसरपंच जगन्नाथ दादर्णे, ग्रामसेवक जी. बी. बीडकर, तलाठी श्रीधर पाटील, पोलिसपाटील बाळकृष्ण मिटके, गिरोलीचे पोलिसपाटील मोहन कदम उपस्थित होते. (वार्ताहर) अभिषेक देणगी घेणारी कार्यालये बंद जोतिबा मंदिरातील अभिषेक देणगी घेणाऱ्या केदारलिंग गुरव समाज संस्था व जोतिबा पुजारी व भक्तगण चॅरिटेबल ट्रस्ट कार्यालये जिल्हा अधिकारी अमित सैनी यांच्या उपस्थितीत बंद करण्यात आली. यावेळी संस्थेचे कोणीही पदाधिकारी उपस्थित नव्हते.
जोतिबा यात्रेत खोबऱ्याची वाटी उधळण्यावर बंदी
By admin | Published: April 04, 2016 12:10 AM