जोतिबा : चांगभलंच्या गजरात जोतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेची शुक्रवारी मोठया धार्मिक उत्साहात सांगता झाली. गुरुवारी रात्रभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शुक्रवार सकाळी ६.३० वाजता धुपारती पालखी सोहळ्याने श्रावण षष्ठी यात्रेची सांगता झाली.जोतिबा डोंगराची दुसरी मोठी यात्रा म्हणजे श्रावण षष्ठीची यात्रा. श्रावण शुद्ध षष्ठीला चर्पटअंबेने रत्नासुराचा वध केला. त्यासमयी राक्षसाच्या रक्ताने देवीच्या अंगाचा दाह झाला, तो शांत करण्यासाठी केदारनाथांसह सर्व देवांनी लिंबू, दूर्वा, बेल वाहून पूजा केली. तेव्हापासून आजतागायत श्रावण शुद्ध षष्ठीला रात्रभर जागरण करून आई चोपडाई देवीची लिंबू, दूर्वा, बेल, फुलांची विशेष पूजा बांधण्यात येते.लिंबूमुळे देवीच्या अंगाचा दाह ज्याप्रमाणे शांत केला, तसा भक्तांच्या जीवनातील त्रिविधी ताप शांत व्हावेत म्हणून फक्त याच यात्रेत भक्ताना लिंबूयुक्त श्रीफळाचा प्रसाद पुजारी देत असतात. ह्या वैशिष्टयपूर्ण यात्रेला भक्तांनी जोतिबा डोंगरावर गर्दी केली. मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले होते. भाविकांनी षष्ठीचा उपवास केला, तसेच चोपडाई देवीला पोषाख अर्पण केला.मुंबई, पुणे, सातारा, कऱ्हाड , सांगली, कोल्हापूरातुन रात्रभर भाविक जोतिबा डोंगरावर येत होते. पोलिस बंदोबस्त मोठया प्रमाणात ठेवण्यात आला होता. दर्शन रांगेसाठी शेड उभा करण्यात आले आहे.
डोंगर घाटमार्गातून एकेरी वहातुक व्यवस्था करण्यात आली होती, तसेच राज्य परिवहन महामंडळामार्फत जादा एसटीची सोयही करण्यात आली होती. रात्रभर मंदिरात सुरू असणारी धुपारती पालखी आज सकाळी ६.३० वाजता मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली. धुपारती पालखी सोहळ्याने श्रावण षष्ठी यात्रेची सांगता झाली.