वारणानगर : आमदार डॉ. विनय कोरे यांनी श्री क्षेत्र जोतिबाला सुंदर नावाचा हत्ती भेट देण्यात आला होता. त्यानंतर सुंदर हत्तीचा छळ होत आहे अशी तक्रार २०१४ ला पेटा (प्राणीमित्र संघटना) कडून झाली होती. त्यावेळी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हा सुंदर हत्ती कर्नाटकातील बाणेरगठ्ठा पार्क येथे जून-२०१४ साली सोडण्यात आला होता. या हत्तीचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच वारणेसह जोतिबा डोंगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आमदार कोरे यांनी वारणा उद्योग समूहाच्या वतीने त्याला श्रद्धांजली वाहिली.
वारणा उद्योग समूहाकडून श्री क्षेत्र जोतिबा देवास ‘सुंदर हत्ती’ भेट म्हणून देण्यात आला होता; पण ''पेटा'' या संस्थेने हत्तीचा छळ होतो, त्याची साखळदंडातून मुक्तता करून प्राणिसंग्रहालयात सोडावे अशी मागणी उच्च न्यायालयाकडे त्या दरम्यान केली होती. या काळात जोतिबावरून ‘सुंदर हत्ती’ वारणानगर येथे आणला होता. जोतिबासह वारणेत देखील त्याची चांगली देखभालही सुरू होती.
असे असताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जिल्हा प्रशासनाने वारणेतून अखेर कर्नाटक इथल्या बाणेरगठ्ठा पार्कमध्ये ‘सुंदर हत्तीला’नेण्यात आले. कोल्हापूर येथील काही जोतिबा भक्त एक-दोन महिन्यांतून केळी, सफरचंद घेऊन खास या ‘सुंदर हत्तीला’ भेटण्यासाठी जात असतात. दोन दिवसांपूर्वी तिथे काही भक्त गेले असता तेथील प्रशासनाने सुंदर हत्तीचे’ २७ ऑगस्ट रोजी निधन झाले असल्याचे सांगितले आणि त्यांना एकच धक्का बसला. कोल्हापुरातून कर्नाटकमध्ये गेलेल्या त्या भक्तांनी शनिवारी थेट आमदार डॉ.विनय कोरे यांना ही माहिती फोनद्वारे दिली. यावेळी डॉ.कोरे यांच्यासह अनेकांना अश्रू अनावर झाले.
सुंदर जोतिबाचा देवाचे प्रतीक होता. तसेच तो आमदार कोरे यांच्यासह जोतिबावरील सर्व भाविक-भक्तांचा आवडता झाला होता. कर्नाटकमध्ये त्याचे निधन २७ ऑगस्टला झाले. या निधनाची माहिती वास्तविक वारणेसह जोतिबा देवस्थानला कळविणे गरजेचे होते. त्याच्या मृत्यूबाबतची माहिती का दडविण्यात आली असा सवाल आमदार कोरे यांनी उपस्थित केला आहे.