लोकमत न्यूज नेटवर्कजोतिबा : जोतिबा डोंगरावर वावर जत्रा या कुलाचार विधीसाठी नवदाम्पत्यांची गर्दी वाढू लागली आहे. नव-वधूवर देवाच्या साक्षीने लग्नगाठ बांधून संसार सुखाचा होऊ दे यासाठी जोतिबाचरणी साकडे घालत आहेत.वैशाख महिना असल्याने लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. वैशाख महिन्यात लग्न झाल्यानंतर जोतिबा दर्शनासाठी नववधू-वरांची वावर जत्रा हा कुलाचार विधी पूर्ण करण्यासाठी मोठी धांदल असते. दोन दिवसांपासून जोतिबा मंदिरात नवदाम्पत्यांची गर्दी वाढू लागली आहे. लग्न झाल्यानंतर जोतिबा मंदिरात वावर जत्रा काढण्याची पूर्वापार प्रथा आहे. आजही तितक्याच श्रद्धेने हा कुलाचार विधी पूर्ण करताना नववधूवर दिसतात. जोतिबाचे स्थानिक पुजारी यांच्याकडून हा कुलाचार विधी के ला जातो. नववधूवरांची देवाच्या साक्षीने परत एकदा लग्नगाठ बांधली जाते. नववधूवर जोडीने देवासमोर पानसुपारी व श्रीफळ ठेवून देवाचा आशीर्वाद घेतात. देवाला लग्नाचा आहेर अर्पण करतात. आपल्या कुलवधूचा परिचय उखाणा घेऊन करतात. पुजारी नववधूच्या ओटीत आशीर्वादाचा नारळ देतात. मंदिराभोवती ओटीचा नारळ व लग्नगाठीसह पाच मंदिर प्रदक्षिणा घालतात. यमाईदेवीला पीठ, मीठ अर्पण करून आमचाही संसार पीठ, मिठाने भरून जाऊ दे, असे देवीला साकडे घालतात. यमाईदेवी मंदिरापाठीमागे नववधूवर खापरांची उतरंड लावून येथून नवीन संसाराची सुरुवात करतात. श्री यमाईदेवीला पातळ, खणा नारळाची ओटी भरतात. लग्नाचा गोंधळ व घुगूळ हा कुलाचार विधीही जोतिबा मंदिरात सुरू आहेत.
जोतिबावर वावर जत्रांची धांदल
By admin | Published: May 08, 2017 12:05 AM