जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर ३ एप्रिलला चैत्र पौर्णिमा यात्रा होत आहे. त्यामुळे यात्रा पूर्वतयारीची धांदल सुरू झाली असून, भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी शासकीय यंत्रणा गतिमान झाल्या आहेत. नारळाचे ट्रक येण्यास प्रारंभ झाला असून, नवसाचे बैल येऊन भाविक जोतिबाचा डोंगरघाट चढू लागले आहेत. जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. डांबरीकरण मार्गावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. सुलभ शौचालयांची, तसेच ग्रामपंचायत इमारतीची रंगरंगोटी केली आहे. पोलीस चौकीची सुसज्ज इमारत तयार झाली असून, यात्रेपूर्वी या ठिकाणी पोलीस विभागाचे कामकाज सुरू होणार आहे. व्यापारी वर्ग नारळ, गुलाल, खोबरे, मेवा-मिठाई खरेदी करण्यात व्यस्त झाला असून, पत्रावजा शेड उभा करीत आहेत. यंदाच्या यात्रेवर अवकाळी पडलेल्या पावसाच्या दुष्काळाचे सावट असल्याचे व्यापारी वर्गातून बोलले जात आहे. नवसाची बैलजोडी येऊन परराज्यातील भाविक आता जोतिबा डोंगरघाट चढू लागले आहेत. रविवारी मांजरी (ता. चिकुर्डी, जि. बेळगाव) येथील आबा रामचंद्र तोरसे, बबन शिंदे हे नवसाचा बैल घेऊन आले. हा बैल जोतिबा देवास अर्पण केला जाणार आहे. अनेक वर्षांची नवसाची धार्मिक परंपरा आजतागायत सुरू आहे.
चैत्री यात्रेसाठी जोतिबा डोंगर सज्ज
By admin | Published: March 29, 2015 10:04 PM