इचलकरंजी : जनतेच्या मनाची नाळ पत्रकारांना कळली पाहिजे. पत्रकार जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे सामाजिक मार्गदर्शकाच्या भूमिकेतून पत्रकारिता करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर यांनी व्यक्त केले.इचलकरंजी येथील श्रमिक पत्रकार संघटनेच्यावतीने रोटरी क्लबमध्ये आयोजित पत्रकार दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे होत्या.कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष हुसेन कलावंत यडंनी स्वागत, तर माजी अध्यक्ष अतुल आंबी यांनी प्रास्ताविक केले. खांडेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये बदलत्या पत्रकारितेचे स्वरूप, पत्रकारांची जबाबदारी, पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकारांचे वेतन, आदी विषयांची सविस्तर मांडणी केली. आमदार सुरेश हाळवणकर यांनी पत्रकारांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, आपल्यामार्फत पाठपुरावा केल्यास येत्या वर्षभरात पत्रकारनगर साकारण्यास सुरुवात होईल, अशी ग्वाही दिली. यावेळी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, अप्पर पोलीस अधीक्षक महंमद मकानदार, आदींची भाषणे झाली.दरम्यान, श्रमिक पत्रकार संघटनेच्यावतीने विविध क्षेत्रांतील व्यक्ती व संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये जयंत मराठे (वस्त्रोद्योग), सायली होगाडे (कला), बाळासाहेब पोकार्डे (क्रीडा), नाईट हायस्कूल (शैक्षणिक) व आपटे वाचन मंदिर (सामाजिक) यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास पोलीस उपअधीक्षक सोनवणे, रोटरीचे अध्यक्ष महेश दाते, सचिव अभय यळरूटे, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, पोलीस निरीक्षक भीमानंद नलवडे, सतीश पोवार, अजित जाधव, तानाजी पोवार, विलास रानडे, दत्ता माने, उषा कांबळे, आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. अनिल दंडगे यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष भस्मे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
पत्रकार जनतेचे प्रतिनिधी
By admin | Published: January 07, 2015 9:58 PM