गडहिंग्लज :
ब्रिस्क फॅसिलिटीज प्रा. लि., कंपनीने सहयोग तत्त्वावर चालवायला घेतलेला येथील अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना मुदतीपूर्वीच सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील सुनावणी सहकार खात्याचे सचिव अरविंदकुमार यांच्यासमोर उद्या (बुधवारी) सकाळी ११ वाजता मुंबई येथे मंत्रालयात होणार आहे.
२०१२-१३ मध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने आर्थिक अरिष्टात सापडलेला हा कारखाना ४३ कोटींच्या बदल्यात १० वर्षांसाठी ‘ब्रिस्क’ला चालवायला देण्यात आला. अद्याप कराराची दोन वर्षे शिल्लक असतानाच कंपनीने कारखाना सोडणार असल्याचे पत्र सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना महिन्यापूर्वीच दिले आहे. त्यानुसार ही सुनावणी होत आहे.
१७ मार्च रोजी पहिली सुनावणी झाली. त्यावेळी सहकार सचिवांनी कंपनीने दिलेल्या येणे-देणे पत्रासंदर्भात कारखाना आणि कंपनीचे म्हणणे ऐकून वस्तुस्थितीचा अहवाल देण्याचे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिले होते. त्यानुसार त्यांनी कारखान्याला भेट देऊन दोन्ही बाजूंचे म्हणणे घेऊन अहवाल सादर केला आहे. सुनावणीत त्यावरही चर्चा होणार आहे.
दरम्यान, करारात नसताना भागवलेली बँकांची देणी, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसीप्रमाणे करावी लागलेली गुंतवणूक, सवलतीच्या दरात सभासदांना दिलेल्या साखरेमुळे पडलेला अतिरिक्त बोजा आणि संपामुळे कर्मचाऱ्यांना कायम करावे लागल्याने पडलेला बोजा मिळून सुमारे ३८ कोटी ५८ लाख इतका जादाचा खर्च कंपनीने केला आहे; परंतु कारखान्याची मशिनरी जुनी झाल्यामुळे आणि पोषक वातावरण नसल्यामुळेच कंपनीने कारखाना सोडण्याचा निर्णय घेतल्याचे खुद्द मुश्रीफ यांनीच यापूर्वी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे गडहिंग्लजसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
-------------------------
* गडहिंग्लज कारखाना : ३००३२०२१-गड-०७