* दुकानगाळे भाड्याची रक्कम यावरून वादंग
आजरा : आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत रस्त्यावरील भाजीविक्रेते, घरफाळ्याची दंडात्मक आकारणी, पाण्याच्या टाकीची जागा, दुकानगाळे भाड्यांची जमा रक्कम, मासेविक्रीच्या गाळ्यावरून अधिकारी व नगरसेवक यांच्यात जुगलबंदी झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी होत्या.
उपनगराध्यक्ष विलास नाईक यांनी स्वागत केले. एकता कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळील जागेवरून अशोक चराटी व संभाजी पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. जागेच्या बदल्यात दुसरीकडे जागेची मागणी अशोक चराटी यांनी केली. त्याला संभाजी पाटील यांनी विरोध केला. पाणी योजना मार्गस्थ लागण्यासाठी भांडण्याऐवजी मार्ग काढा, असे सिकंदर दरवाजकर यांनी सांगितले. जागेबाबत ग्रामपंचायतीचे पाठीमागील इतिवृत्त पाहून मग निर्णय घेण्याचे नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी यांनी सांगितले. गटारीवरील भाजीविक्रेत्यांबाबत सदस्यांनी आपली मते मांडावीत, असे नगराध्यक्ष चराटी यांनी सुचविले. यावर सर्वांनी भाजीमंडईत विक्रीसाठी बसवा. प्रशासनाने अगोदर माहिती द्यावी व मगच कारवाई करावी. नगरसेवकांनी त्यामध्ये भाग न घेण्याचे ठरले. अधिकारी येत नाहीत म्हणून काम थांबवायचे का? वरिष्ठांनी अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नये, कामाचे तातडीने अंदाजपत्रक होत नाहीत अशा तक्रारी अशोक चराटी, अस्मिता जाधव यांनी केले. घरफाळा वसुलीसाठी मार्चपर्यंत मुदत असतानाही २४ टक्के दंड आकारून वसुली सुरू आहे. यावरून सभागृहात गदारोळ सुरू झाला. घरफाळा वसूल करा पण दंडात्मक वसुली नको असे उपनगराध्यक्ष विलास नाईक, संभाजी पाटील, अस्मिता जाधव, संजीवनी सावंत यांनी सांगितले.
नगरपंचायतीने बांधलेल्या दुकानगाळ्यांची भाड्याची रक्कम २०१२ पासून १०० टक्के वसूल झालेली नाही. येणे रक्कम किती आहे, भाड्याची रक्कम न दिलेल्या दुकानदारावर काय कारवाई करणार? असा सवाल किरण कांबळे यांनी केला.
याबाबतचा हिशेब देऊन तातडीने कारवाईचे आदेश मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी दिले.
--------------------------------------
* शहरातील अतिक्रमणे काढता, मग कुमारभवन शाळेसमोर चहाचे गाडे का ?
* भुदरगड पतसंस्थेजवळील रिकाम्या जागेत दुकानगाळे उभे करा.
* घरफाळ्याची १ कोटी २३ लाखांपैकी फक्त ३१ लाख वसूल, तर ९२ लाख थकित.
* नवीन नळपाणी योजनेची कामे नगरपालिका फंडातून होणार नाहीत.
* महाजन गल्ली व भारत नगरमधील पाइपलाइनला मंजुरी.