संदीप बावचे ल्ल जयसिंगपूरशिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. गावोगावी प्रचार फेऱ्या, बैठका, मतदार भेटीला वेग आला आहे. सर्वच उमेदवार तुल्यबळ असल्याने उमेदवारांना गर्दी जमविणे व आपले कार्यकर्ते सांभाळणे आव्हान ठरत आहेत. स्वाभिमानीसह भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व शिवसेनेकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आज, सोमवारी माघारीचा अंतिम एकच दिवस असल्याने मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट व पंचायत समितीचे चौदा गण आहेत. गत निवडणुकीत स्वाभिमानीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी लढत झाली होती. मात्र, या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना व भाजप यांच्यासह छत्रपती ग्रुप, ताराराणी विकास आघाडी, संभाजी ब्रिगेड, भाकप, आदींसह अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सर्वच पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडला असून, आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. जिल्ह्यातील नेत्यांनी आपल्या मुलांना जि. प. अध्यक्षपदासाठी उमेदवारी देऊन स्वार्थी राजकारण सुरू केले आहे, तर सामान्य शेतकऱ्यांना स्वाभिमानीने उमेदवारी दिली आहे, असा स्वाभिमानीच्या प्रचारातील मुद्दा आहे. नृसिंहवाडी येथे खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत स्वाभिमानीच्या प्रचाराचा नारळ फोडला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचारादरम्यान, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना व भाजप हे दोन्हीही पक्ष जातीवादी आहेत. त्यांना मतदारांनी सत्तेपासून दूर ठेवावे, असे आवाहन केले आहे. कन्यागत महापर्वकाळाच्या निमित्ताने कोट्यवधी रुपयांचा निधी आणून तालुक्याचा विकास साधण्याचा प्रयत्न केला असून, आणखी विकासकामांसाठी शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन आमदार उल्हास पाटील यांनी प्रचारादरम्यान केले आहे, तर जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करण्यासाठी मतदारांनी कमळ फुलवावे, असे आवाहन करून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ऊस उत्पादकांना आंदोलनाशिवाय एफआरपी मिळाली. त्यामुळे शिरोळ तालुक्यात भाजपला साथ द्यावी, आणखी विकास घडेल, असा आशावाद पालकमंत्री पाटील यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला आहे. एकूणच शिरोळ तालुक्यात आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळामुळे तालुका संवेदनशील बनला आहे. वर्चस्वाच्या लढाईत कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.
शिरोळ तालुक्यात सत्तेसाठी जुगलबंदी
By admin | Published: February 12, 2017 11:45 PM