कोरोनाच्या पहिल्या लाटेत तीन महिन्यात रस्त्यावरील श्रमिकांचे मोठे हाल झाले. त्यात रिक्षाचालक, घरेलू कामगार, फेरीवाले, बांधकाम कामगार यांचा समावेश होता. यांना मोठ्या हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले. त्यानंतर पुन्हा दुसरी लाट आली. पुन्हा तेच संकट आवासून उभे राहिले. हा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटकातील नोंदणीकृतांना प्रत्येकी पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात अनुदान स्वरूपात देण्याचे घोषणा केली. ज्यांची नोंदणी नाही असे पन्नास टक्के या अनुदानापासून वंचित राहणार आहेत. त्याकरिता काही तरी उपाययोजना शासनाने करणे गरजेचे बनले आहे. राज्य शासनाने कोल्हापूर जिल्ह्याकरिता सुमारे १२ ते १५ कोटींची या अनुदानाकरिता तरतूद करणे गरजेचे आहे.
नोंदणी अशी,
रिक्षाचालक - १६ हजार
घरेलू मोलकरीण - १५ हजार
फेरीवाले - (अनोंदणीकृत १२ हजार) नोंदणीकृत ५ हजार ६०७
बांधकाम कामगार - पात्र लाभार्थी ६५ हजार
चौकट
पात्र लाभार्थी असलेल्या काही बांधकाम कामगारांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जे बांधकाम कामगार यावर्षी नोंदणी करू शकले नाहीत, त्यांच्याही खात्यात मागील वर्षाचा ग्रेस कालावधी गृहीत धरून पंधराशे रुपये जमा करावेत, अशी मागणी बांधकाम कामगार संघटनांकडून होत आहे.
प्रतिक्रिया
फेरीवाल्यांची संख्या सुमारे बारा हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे त्या सर्वांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पंधराशेचे अनुदान मिळायला हवे.
रघुनाथ कांबळे , उपाध्यक्ष, कोल्हापूर फेरीवाले संघटना
प्रतिक्रिया
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेले पंधराशे रुपयांचे अनुदान रिक्षाचालकांच्या खात्यात त्वरित जमा करून त्यांना दिलासा द्यावा.
- चंद्रकांत भोसले, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना
प्रतिक्रिया
सर्वच घरेलू मोलकरणींना सरकारने जाहीर केलेली पंधराशेची मदत त्वरित बँकेत जमा करावी. जेणेकरून काहीअंशी दिलासा मिळेल .
सुशीला यादव, अध्यक्षा, राज्य घरेलू मोलकरीण संघटना
प्रतिक्रिया
सव्वा लाख बांधकाम कामगार जिल्ह्यात आहेत. मात्र, त्यांना यावर्षी कोरोनामुळे नोंदणी करणे शक्य झाले नाही. त्या सर्वांच्या खात्यात सरकारने जाहीर केलेले पंधराशे रुपये जमा करावेत.
शिवाजी मगदूम, जिल्हा सरचिटणीस, लाल बावटा कामगार संघटना