कोल्हापूर : पाचगावमधील वृद्धेचा खून संशयित आरोपी संतोष निवृत्ती परीट (३५, रा. राजलक्ष्मी अपार्टमेंट, माळी कॉलनी, टाकाळा, कोल्हापूर) याने टाकाळा येथील राजलक्ष्मी अपार्टमेंटच्या तळघरातील खोलीतच भिंतीवर डोके आपटून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्याने शुक्रवारीच (दि. ५) दुपारी अवघ्या अडीच तासांत खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची माहिती पुढे आली. संशयित परीट याला गुरुवारी न्यायालयाने दि. १८ फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडी सुनावली.
सोन्याच्या दागिन्यांसाठी शांताबाई शामराव आगळे-गुरव (वय ७०, रा. जगतापनगर, पाचगाव, ता. करवीर) या वृद्धेची क्रूरपणे हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते राजाराम तलावासमोरील कृषी विद्यापीठाच्या माळावर फेकल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी सकाळी मृतदेहाचा कमरेपासून पायापर्यंतचा भाग, खांद्यापासून डावा हात, शिर असे अवयव पोलिसांना मिळाले. पोलिसांनी काही तासातच संशयित संतोष परीटला अटक केली.
दरम्यान, शुक्रवारी (दि. ५) संशयित परीटच्या पत्नीच्या नातेवाइकाचे दिवसकार्य असल्याने त्याने तिला मोपेडवरून सकाळी दसरा चौकांत सोडले, तेथून तो पाचगाव येथे गेला. देवकार्याचे निमित्ताने वृद्धा शांताबाई आगळे यांना घेऊन तो एका भाड्याच्या रिक्षात बसवून मोपेडवरून सोबत टाकाळा येथे रूमवर आला. दुपारी बाराच्या सुमारास त्याने वृद्धेचे डोके भिंतीवर आपटून त्यांचा खून केल्याची कबुली दिली.
दरम्यान, गुरुवारी पोलिसांनी संशयित परीट राहत असलेल्या टाकाळा येथील राजलक्ष्मी अपार्टमेंटच्या तळघरातील खोलीची तासभर झडती घेतली. अपार्टमेंटमधील सीसी कॅमेरेही तपासले. त्यापैकी काही फुटेज ताब्यात घेतले.
संशयिताचे तपासात सहकार्य नाही
संशयित परीट हा तपास कामाला सहकार्य करत नसल्याचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांनी सांगितले. मृतदेहाचे धड अद्याप मिळाले नसल्याने तसेच ते टाकाळा येथून मृतदेहाचे अवयव कसे, कोठे नेले, तुकडे कोठे केले, आणखी कोणाचा सहभाग आहे काय? याचीही त्याने अद्याप माहिती पोलिसांना दिलेली नाही.
मोपेडवरून मृतदेहाची विल्हेवाट शक्य
सकाळी पत्नीला नातेवाइकांकडे सोडून आला, दोन्हीही मुले अकरा वाजता शाळेला गेली. दरम्यान, तो दुपारी १२ वाजता वृद्धेला रिक्षाने घेऊन अपार्टमेंटमध्ये आला. तो वृद्धेसोबत अपार्टमेंटमध्ये प्रवेशाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. तेथून तो तळघरातील खोलीत गेला. दुपारी अडीच वाजता त्याची दोन्हीही मुले शाळेतून घरी आली, सायंकाळी पत्नीही घरी आली, त्यावेळी संशयित घरीच असल्याचे चौकशीत आढळले. त्यामुळे दुपारी १२ ते अडीच वाजेपर्यंत त्याने वृद्धेचा डाव खल्लास केल्याची तसेच मृतदेहाचे अवशेष त्याने मोपेडवरून नेऊन फेकल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
फायनान्स प्रतिनिधी व पत्नीकडे चौकशी
संशयिताने वृद्धेला ठार मारून तिचे दागिने तारण ठेवलेल्या फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी तसेच संशयिताची पत्नी यांच्याकडे गुरुवारी चौकशी केली.
धड अद्याप गायबच
पोलिसांना वृद्धेचे इतर अवयव मिळाले; पण अद्याप धड व उजव्या हाताचे अवशेष मिळाले नाहीत. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
फोटो नं. ११०२२०२१-कोल-संतोष परीट (आरोपी)