कोल्हापूर : अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या मुस्लिम बांधवांच्या पवित्र ‘रमजान ईद’मुळे शहरातील बाजारपेठा खरेदीसाठी गर्दीने गजबजल्या होत्या; तर शबे कद्र (बडी रात) २७ व्या दिवशी इफ्तारी सात वाजून पाच मिनिटांनी संपली. हा रोजा मुस्लिम बांधवांसह अन्यधर्मीयांनी मोठ्या उत्साहात केला.यानिमित्त बाबूजमाल दर्गा परिसरात हिंदू-मुस्लिम महिलांनी महत्त्वाचा मानला जाणारा सत्ताविसावा रोजा सोडण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी अनेक हिंदू व मुस्लिम व्यक्ती, संघटनांकडून केळी, उपवास सोडण्याचे पदार्थ वाटण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी हा उपवास सोडण्यात आला. यावेळी मोठी गर्दी झाली होती. यासह बडी मस्जिद व शहरातील अन्य मस्जिदच्या बाहेरील बाजूस महिलांनीही उपवास सोडला.दिवसभराच्या उकाड्यामुळे मुस्लिम बांधवांनी रविवारी सायंकाळी खरेदीसाठी बाहेर पडणे पसंत केले. रात्री शिवाजी चौक, हत्तीमहाल रोड, शिवाजी रोड, महाद्वार रोड, पापाची तिकटी, बडी मस्जिद, राजारामपुरी, शाहूपुरी, आदी ठिकाणी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यात कपडे, सुका मेवा खरेदीला प्राधान्य देण्यात आले. खास ईदसाठी काही दुकानांमध्ये सेल लागल्याने या ठिकाणीही खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती.
कपड्यांच्या खरेदीबरोबर शिरकुर्मा अर्थात खिरीची साहित्यखरेदीही मोठ्या प्रमाणात झाली. यात काजू , चारोळी, खारीक, बदाम, वेलदोडे, केशर, अक्रोड, मगज बी, नियमित हातांवर वळलेल्या शेवया, मिरज येथील भाजक्या शेवया यांना अधिक मागणी होती. यासोबतच सुगंधी अत्तरेही बाजारात आली आहेत. त्यांचीही खरेदी मोठ्या प्रमाणात झाली.