कोल्हापूर : दिव्यांग दिनाच्या औचित्याने सावली केअर सेंटरतर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी मोफत स्वावलंबन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. चिपळूण येथे शनिवारी (दि. ८) व रविवारी (दि. ९), तर रत्नागिरी येथे १५ व १६ डिसेंबरला हे शिबिर होणार आहे.दिव्यांगत्व आलेल्या व्यक्तींसाठी गेल्या १४ वर्षांपासून स्वावलंबन शिबिरे आयोजित केली जात आहेत, अशी माहिती सेंटरचे अध्यक्ष किशोर देशपांडे यांनी रविवारी येथे दिली.दिव्यांगत्व स्वीकारून कृत्रिम उपकरणांच्या साहाय्याने बऱ्याच गोष्टी स्वायत्तपणे करता येणे शक्य असते. यासाठी गरज आहे ती मानसिक उभारीची आणि छोट्या-छोट्या क्लृप्त्यांची. यासाठी ‘सावली केअर सेंटर’तर्फे कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या व्यक्तींसाठी ‘स्वावलंबन शिबिरे’ सातत्याने आयोजित केली जातात.या प्रकल्पाचा लाभ रत्नागिरी जिल्ह्यातील गरजूंना व्हावा, यासाठी प्राथमिक तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे. याच्या नियोजनासाठी रोटरी क्लब आॅफ चिपळूण आणि रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने सक्रिय सहभाग घेतला आहे.शनिवारी (दि. ८) व रविवारी (दि. ९) सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत चिपळूण येथील रोटरी हॉल, मार्कंडी, कऱ्हाड रोड येथे; तर १५ व १६ डिसेंबरला सकाळी ११ ते सायंकाळी पाच या वेळेत रत्नागिरीतील शहर ज्येष्ठ नागरिक संघ हॉल, आय. टी. आय. रोड, नगर वसाहत, शिवाजीनगर येथे स्वावलंबन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी सेंटरच्या कोेल्हापुरातील राधानगरी रोडवरील पिराचीवाडी येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन किशोर देशपांडे आणि विश्वस्त मंडळाने केले आहे.
तज्ज्ञांचे मार्गदर्शनसंस्थेकडे अद्ययावत उपकरणांसोबत फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, फिजिशिअन, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, स्पेशल एज्युकेटर या तज्ज्ञांची उपलब्धता आहे. त्याचा उपयोग व मार्गदर्शन यावेळी होणार आहे.
दिव्यांगांना स्वावलंबनाचे धडेशिबिर संपताना शिबिरार्थी प्रातर्विधी, अंघोळ अशी स्वत:ची आन्हिकेच नव्हे तर कपडे धुणे, स्वयंपाक, बाजारहाट स्वबळावर करू शकतील, असा प्रयत्न केला जाईल, असे सांगण्यात आले.