जोतिबा : जोतिबा मंदिरामध्ये तिसरा रविवार खेट्याला भाविकांनी अलोट गर्दी केली. पहाटेपासूनच दर्शन रांगा लागल्या. लहान मुलांसह भाविक दक्षिण दरवाजातून मंदिर प्रवेश करत होते. उत्तर दरवाजातून मंदिराबाहेरचा मार्ग खुला केला होता. लहान मुलांना मंदिर प्रवेश खुला केल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जोतिबाचे दर्शन झाल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद विलसत होता.
‘चांगभलं’च्या गजरात धूपारती पालखी सोहळा झाला. जोतिबा मंदिरात धार्मिक कार्यासाठी व देवसेवेत वापरण्यात येणाऱ्या उन्मेष नावाच्या अश्वाचे नुकतेच निधन झाले. त्याची उणीव जाणवली. त्याच्या जागी नवीन घोड्याची प्रतीक्षा सर्वांना लागली आहे. देवस्थान समितीच्या वतीने पंचकल्याणी अश्वाचा शोध सुरू असून, पूर्वी ज्या भाविकांनी श्री चरणी अश्व अर्पण केले आहेत त्यांनाही आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
चैत्र यात्रेपूर्वी जोतिबा डोंगरावर अश्व आणण्यासाठी समिती कामाला लागली असून, युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. उंट, घोडे या प्राण्यांना मानाचे प्राणी म्हणून मान आहे. दर शनिवारी घोडा हा मंदिराबाहेर दरवाजासमोर उभा केला जातो. दर रविवारी व चैत्र यात्रेत त्यास पालखी सोहळ्यात सहभागी करून घेतले जाते. त्यासाठी देवस्थान समितीने कायमस्वरूपी कर्मचारी नेमला आहे. घोड्याची देखभाल किशोर घाडगे करतात. डोंगरावर मानाचा घोडा निवडताना तो काठेवाडी घ्यावा लागतो. देवकार्यात वापरल्या जाणारा घोडा हा पंचकल्याणी किंवा अष्टमंगल असाच घ्यावा लागतो.
सलग तीन रविवार खेट्याला भाविकांकडून मंदिर प्रशासनाला चांगले सहकार्य लाभले असून, निर्विघ्न आतापर्यंत खेटे पार पडले आहेत. चैत्र यात्रेपूर्वी देवाचा नवीन अश्व मंदिरात दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. - केदारलिंग देवस्थान समिती अधीक्षक दीपक म्हेत्तर.