कोल्हापूर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वाडी रत्नागिरी (जि. कोल्हापूर) येथील ‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबाची चैत्र यात्रा शनिवारी (दि. ३१) पार पडली. यात्रा संपताच भाविकांनी रविवारी परतीचा प्रवास सुरू केला. जोतिबा यात्रेसाठी आलेल्या भाविकांनी परतताना अंबाबाई मंदिरात दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केल्याने बिंदू चौकातील पार्किंग दुपारी हाऊसफुल्ल झाले होते.मुख्य यात्रा संपताच भाविकांनी रविवारी सकाळपासून परतीचा प्रवास सुरू केला. पंचगंगा नदीघाटावर भाविकांनी अंघोळीसाठी दिवसभर मोठी गर्दी केली होती. भाविकांचा उत्साह अजूनही कायम होता. शहरातील काही चौकांत भाविकांतर्फे सासनकाठी रविवारी नाचविण्यात येत होत्या. यावेळी सासनकाठ्यांचे सुहासिनींकडून औक्षण करून, पायांवर पाणी घालण्यात येत होते.जोतिबा यात्रेनंतर बाहेरच्या जिल्ह्यातील भाविक अंबाबाईचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करतात. दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात भाविकांच्या भर उन्हातही मोठ्या रांगा लागल्या होत्या. रविवारी अंबाबाई देवीचा रथोत्सव असल्याने काही भाविकांनी कोल्हापुरात मुक्काम केला होता. त्यामुळे दुपारी बिंदू चौक येथील पार्किंग फुल्ल झाले होते. मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानक येथेही दिवसभर प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. मध्यवर्ती बसस्थानकात कोल्हापूर विभागातर्फे सोलापूर, बेळगाव, कºहाड, सातारा या मार्गांवर प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या सोडण्यात येत होत्या.
जोतिबाचे भाविक परतीच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 12:27 AM