कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांची चौकशी पूर्ण झाली असून, यामध्ये त्या दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. चौकशीमध्ये गंभीर बाबी पुढे आल्या असून, याबाबत समाधानकारक खुलासा न दिल्याने शिंदे यांच्यावर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याची शिफारस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. तक्रारीचे स्वरूप पाहता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आर्थिक व्यवहार करून चुकीच्या वैयक्तिक मान्यता दिल्याच्या व भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी शिंदे यांच्याबद्दल झाल्या होत्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने इन कॅमेरा चौकशी केली. चौकशी सुरू असतानाच पन्नासहून अधिक नव्याने तक्रारी दाखल झाल्या होत्या. यामध्ये न्यायालयाचे आदेश डावलून संस्थाचालकांना जाणीवपूर्वक त्रास दिल्याचा समावेश होता. मूळ तक्रारीसह ३८ मुद्द्यांची चौकशी करण्यात आली. यामध्ये त्या दोषी आढळल्या आहेत. चौकशीमध्ये त्यांच्यावर ठेवण्यात आलेल्या ठपक्याबाबत शिंदे यांनी शिक्षणाधिकारी म्हणून समाधानकारक खुलासा सादर न केल्याने तक्रारींमध्ये तथ्य असल्याचा प्राथमिक अंंदाज आहे. त्यानुसार या संपूर्ण चौकशीत त्या दोषी आढळल्याचे स्पष्ट झाले असून, तसा अहवाल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांनी शनिवारी दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्याकडे सादर केला. चौकशी समितीच्या अहवालातील गंभीर ताशेरांचा विचार करून डॉ. खेमणार यांनी शिंदे यांच्यावर कडक कारवाई करण्याची शिफारस विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्याकडे केली आहे. तक्रारीचे स्वरूप व अहवालातील अभिप्राय पाहता शिंदे यांच्यावर कडक कारवाई होणार हे निश्चित आहे. अशा तक्रारी व त्यावर झालेल्या कारवाई पाहता निलंबनाची कारवाई होऊ शकते, असा अंदाज जिल्हा परिषद प्रशासनाचा आहे. काय होऊ शकते कारवाई १ ते ३ वेतन वाढ रोखणेआर्थिक नुकसानीची वसुलीअनियमितता असेल तर मूळ पगारावर आणू शकतातनिलंबन अथवा बडतर्फसक्तीच्या सेवानिवृत्तीस भाग पाडणे ज्योत्स्ना शिंदे यांच्यावरील तक्रारींचा चौकशी अहवाल प्राप्त झाला असून, त्यामध्ये गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. तक्रारींबाबत त्यांनी समाधानकारक खुलासा न केल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची शिफारस आयुक्तांकडे करणार आहे. - डॉ. कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी
ज्योत्स्ना शिंदे दोषीच
By admin | Published: February 19, 2017 12:51 AM