कोल्हापूर : ज्येष्ठ चित्रकार, मूर्तिकार के. आर. कुंभार यांचा पहिला स्मृतिदिन मंगळवारी (दि. ७) होत आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी कुंभार परिवारातर्फे १० ऑक्टोबरला कलाशिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना कुंभार परिवारातर्फे शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती उदय कुंभार यांनी दिली. के. आर. कुंभार हे जुन्या पिढीतील नावाजलेले चित्रकार होते. त्यांनी अनेक चित्रपटांचे पोस्टर्स तयार केले होते, जे त्याकाळात विशेष गाजले. त्यांचे आणि गणेशमूर्तींचे अतुट नाते होते. कोल्हापुरात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची सुरुवात त्यांनी केली. तसेच आठ फूट उंचीची पंचमुखी गणपतीची शाडूतील मूर्ती, एकवीस फुटी मूर्तीतही त्यांचा हातखंडा होता. निवडणुकीत भव्य पोस्टर्स आणि कटआउटची संकल्पना त्यांनीच पहिल्यांदा आणली जी पुढे देशभरात राबवली गेली. ते कुमावत को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, कलामंदिर महाविद्यालयाच्या माध्यमातूनही कार्यरत होते. त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी या क्षेत्रातील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार असून, त्याचे वितरण त्यांच्या जयंतीदिनी म्हणजेच १० ऑक्टोबरला होणार आहे.
---
---