कबनूर : येथील ग्रामपंचायत कामगारांच्या विविध मागण्या व समस्यांवर प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा. यासाठी आज, सोमवारी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, असा निर्णय कामगार संघटनेने घेतला आहे.
ग्रामपंचायत कामगारांना महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले किमान वेतन तात्काळ लागू करावे. भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगारांच्या खात्यावर वर्ग करावी. शिल्लक रजेचा हिशेब द्यावा, आदी मागण्यांसाठी येथील ग्रामपंचायत कामगारांनी आंदोलन करण्याचा निर्णय कामगारांच्या बैठकीत घेतला. अध्यक्षस्थानी अप्पा पाटील होते. आंदोलनाची सुरुवात आज, सोमवारपासून होत आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येणार आहे. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ निर्णय घेऊन कामगारांना न्याय द्यावा, असे आवाहन कुमार कांबळे यांनी केले. औदंबर साठे यांनी प्रास्ताविक केले. बैठकीस दिलीप शिंदे, उत्तम गेजगे, नागेश कांबळे, मीना कांबळे यांच्यासह कामगार उपस्थित होते.