संजय कळके ल्ल पोहाळे तर्फ आळतेकोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा ऊर्फ श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) हे अनेकांचे कुलदैवत. श्री क्षेत्र जोतिबापासून चार ते सहा किलोमीटर अंतरावर पायथ्याशी असलेले केखले हे चार हजार लोकसंख्येचे छोटेस गाव. या गावाने तंटामुक्तीचा पुरस्कारही मिळविलेला आहे. राजकीयदृष्ट्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांच्या प्रभुत्वाखाली येणारे हे गाव. येथे पारंपरिक पीक म्हणून प्रामुख्याने उसाची शेती केली जाते. चैत्र महिन्यात या गावास मोठे महत्त्व येते. या गावातील दवणा सर्वत्र परिचित आहे. जोतिबा देवाला गुलाल, खोबरे याबरोबरच दवणाही अर्पण केली जाते. या गावात छोटे-मोठे शेतकरी हे दवणा हे पीक घेतात. गावचे क्षेत्र पाहता २० एकर क्षेत्राचा या पिकासाठी वापर केला जातो. जोतिबावर गुलाल, खोबरे, खारीक यांची उधळण केली जाते; पण यासोबतच केवळ केखले या गावातच पिकणारा दवणा ही सुगंधी वनस्पती जोतिबा चरणी वाहण्याची प्रथा आहे. गावात बहुतांश शेतकरी आहेत. २0१५ मध्ये गावाने तंटामुक्तीचा पुरस्कारही मिळविलेला आहे. त्याअंतर्गत गावाला पाच लाखांचा धनादेश देण्यात आला आहे. केखलेचे सरपंच ईश्वरा पाटील, उपसरपंच वनिता भिसे, ग्रामसेवक शिवाजी पाटील यांनी त्यासाठी प्रयत्न केले होते. दवणाचा इतिहासगणपतीला दुर्वा, महादेवाला बेल भक्तिभावाने जसे वाहिले जाते, तसेच जोतिबाला दवणा वाहण्याची प्राचीन कुलाचार आहे. वात, पित्त, कफ या त्रिदोषांवर औषधी असणारा सुगंधी दवणा हे जोतिबाचे आवडते फूल. एकवेळ फुलांचा हार नसला तरी चालेल, पण दवण्याच्या दोन काड्या आणि चिमूटभर गुलाल वाहिला जातो. गुलाल, खोबऱ्याबरोबर दवणा वाहणे ही येथील परंपरा आहे. संस्कृतमधील दमन नावावरून साधारण फूटभर उंच वाढण्याच्या भुरकट पांढऱ्या रंगाच्या वनस्पतीस ‘दवणा’ असे म्हणतात. ही वनस्पती मूळची काश्मीरमधील. शास्त्रीय इंग्रजी भाषेत या वनस्पतीला ‘आर्टिमीसिया सीवार्सिआना’ असे म्हणतात. दवण्याची अन्य जात जंगलात उगवते म्हणून तिला ‘वन्य दमण’ या नावानेही ओळखले जाते. जोतिबासह शनी शिंगणापूर, नाईकबा या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणीही दवणा अर्पण केला जातो. वर्षभर मागणीदवण्यासाठी केवळ चैत्र यात्रेलाच नव्हे, तर वर्षभर मागणी असते. केखले गावातील चाळीसहून अधिक शेतकरी वर्षभर दवण्याची शेती करतात. काही शेतकरी मात्र केवळ चैत्र यात्रेला आणि श्रावण महिन्यात षष्ठीला निघणाऱ्या पालखीला दवण्याची विक्री करतात. गावातील रोहिणी पाटील, त्यांचे चिरंजीव प्रथमेश पाटील हे मात्र श्री क्षेत्र जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठीच दवणा घेतात. आज, सोमवारी ही यात्रा भरत आहे. दोन दिवस आधी देवस्थान परिसरात थेट विक्री सुरूआहे. अगरबत्तीसाठीही दवण्याचा वापरमूळच्या हिमालयातील असलेल्या या वनस्पतीला सुगंध आहे. नावाप्रमाणे वात, पित्त, कफ या आजारांवर गुणकारी असणारी ही वनस्पती औषधीही आहे. तापांचे दमन करण्यासाठी आणि उन्हाळ्यात याचा वापर होत असल्याने याला महत्त्व आहे. सुगंधी असल्यामुळे अगरबत्तीसाठी दवणाचा वापर केला जातो. त्यामुळे जोतिबाला भक्तिभावाने वाहिल्या जाणाऱ्या या वनस्पतीचा सुंगधी उपयोग अगरबत्तीसाठी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून दवण्याला, विशेष वाळलेल्या दवण्याला मोठी मागणी असते. बेळगाव, कारवार येथील व्यापारी दवणा खरेदीसाठी येथे संपर्क करतात.केखल्याला नैसर्गिक देणगी जोतिबा डोंगर आणि केखले गावचे अतूट नाते नैसर्गिक आहे. केखले वगळता शेजारील जाखले, पोखले येथेही दवणा घेतला जातो; पण त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, केखलेमध्येच त्याचे उत्पादन चांगले होते अशी इथे धारणा आहे. गावाजवळच असणाऱ्या जोतिबाला दवणा लागणे आणि त्याचे उत्पादन आपल्या गावात होणे, हे अभिमानास्पद असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
केखल्याचा ‘दवणा’ जोतिबाच्या मानाचा
By admin | Published: April 10, 2017 12:44 AM