विश्वास पाटील, कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीची प्रत्यक्ष रणधुमाळी सुरू होण्यास अजून काही दिवसांचा अवधी असताना कागल विधानसभा मतदारसंघातील वातावरण भलतेच तापू लागले आहे. पण म्हणून कुणीही आरोप-प्रत्यारोपांची पातळी सोडणे योग्य नव्हे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ही पातळी काल दुसऱ्यांदा सोडली आणि विरोधी उमेदवारास त्यांनी थेट शिवीगाळच केली. त्यामुळे पाचवेळा आमदार, जिल्ह्याचे पालकमंत्री, तब्बल अठरा वर्षे मंत्रिपद आणि राज्याच्या राजकारणात स्थान निर्माण केलेल्या नेत्याने एवढ्या खालच्या पातळीवर उतरणे योग्य नव्हे, अशाच प्रतिक्रिया समाजातून उमटल्या आहेत. त्यांचा प्रचार या पातळीवर गेला तर तो त्यांनाच अडचणीत आणणारा ठरू शकतो, याचे भान बाळगण्याची गरज आहे, अशीही भावना व्यक्त झाली आहे.
आतापर्यंतच्या अनेक निवडणुकीतील अनुभव असे आहेत की, लोकांना अशी खालच्या पातळीवरील टीकाटिप्पण्णी अजिबात आवडत नाही. कोल्हापूर लोकसभा मतदार संघात २००९ च्या निवडणुकीत म्हातारा बैल ही सदाशिवराव मंडलिक यांच्याबद्धल शरद पवार यांनी केलेली टिप्पनी निकाल फिरवून गेली होती..लोकसभा निवडणुकीत बारामतीत शरद पवार यांचा पराभव करून राजकारण संपवणे हेच भाजपचे टार्गेट असल्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीलाच तिथे जाऊन जाहीर केले. अन्य अनेक कारणांइतकेच सुनेत्रा पवार यांच्या पराभवास ते एक महत्त्वाचे कारण ठरले. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी डी. वाय. पाटील घराण्याविषयी वापरलेले अपशब्द त्या लढतीत त्यांना मागे न्यायला कारणीभूत ठरले. अशी अनेक उदाहरणे देता येतील. चारच दिवसांपूर्वी शिंदेसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याविषयी अपशब्द वापरल्यावर स्वत: हसन मुश्रीफ यांनीच अशी खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे योग्य नव्हे, अशी प्रतिक्रिया दिली होती आणि आता मात्र ते स्वत: त्याच वाटेने निघाले आहेत. त्यांचे विरोधक समरजित घाटगे हे राजर्षी शाहूंच्या जनक घराण्याचे वारसदार आहेत म्हणून त्यांच्यावरच नव्हे तर कुणावरही अशी शिवराळ भाषेत टीका करणे योग्य नव्हे. ईडीच्या कारवाईमागे समरजित घाटगे यांचा हात असल्याचा मुश्रीफ यांचा आरोप आहे. तो असणे स्वाभाविक आहे. परंतु म्हणून त्यांच्यासारख्या राजकारणात अनेक उन्हाळे, पावसाळे तसेच आव्हाने पचवलेल्या नेत्याने असे बोलणे योग्य नाही. मध्यंतरी त्यांनी आपण अल्पसंख्याक असल्यानेच शरद पवार आपली कोंडी करत असल्याचेही विधान केले. आपण अल्पसंख्याक आहात हे तुमच्या तालुक्यालाच काय जिल्ह्यानेही कधीच लक्षात ठेवलेले नाही. हीच तर या शाहू महाराजांच्या भूमीची खरी ओळख आहे. म्हणूनच तुम्हाला जनतेने तब्बल पाच वेळा आमदार केले. पवार यांनी आपल्यासारख्या अल्पसंख्याक समाजातील नेतृत्वाला किती संधी दिली म्हणून त्यांच्यासमोरच आपण एकदा गहिवरून रडला होता. असे असताना आता तुम्हीच अल्पसंख्याक असल्याने माझी कोंडी केली जात असल्याचे म्हणणे हे दुटप्पीपणाचे आहे.
दुसरी लढत...!
हसन मुश्रीफ यांनी सहावेळा विधानसभा लढवली, सलग पाचवेळा विजयी झाले. हे भाग्य कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात आतापर्यंत यशवंत एकनाथ पाटील, जयवंतराव आवळे आणि दिग्विजय खानविलकर यांच्याच वाट्याला आले आहे. हयात गेली तरी अनेकांच्या वाट्याला यातील एकदाही गुलाल आलेला नाही. आजपर्यंत लोकांची कामे केलीत, त्यांच्या हाकेला धावून गेलात, ही तुमची राजकारणातील जमेची बाजू आहे. समरजित घाटगे यांच्यासोबत तुमची एकदाच लढत झाली आहे, आणि आता दुसऱ्यांदा सामोरे जाणार आहेत. अजून निवडणूकही जाहीर झाली नसताना इतके अस्वस्थ होण्याची गरज नव्हती. आपल्याकडून जिल्ह्याचे पालक असल्याने जास्त अपेक्षा आहेत. हसन मुश्रीफच असे बोलू लागले तर मग इतरांकडून काय अपेक्षा ठेवावी...अशी विचारणा म्हणूनच झाली.