कागल : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातीवरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. धार्मिक धावना दुखावल्याचे कारण देत यावरुन टीका-टीप्पणी सुरु झाल्या. यावरुन शाहू ग्रुपचे अध्यक्ष, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनीही मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. तर, आपण स्वत: यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचेही घाटगे यांनी सांगितले. यासर्व घडामोडीनंतर मंत्री मुश्रीफ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.माझ्या वाढदिवसाला कार्यकर्ते जाहीराती देतात. वाढदिवसाच्या दिवशी मी हजर नसतो. त्यामुळे समरजित घाटगे माझ्या विरोधात तक्रार दाखल करून फक्त स्टंट करीत आहेत. माझ्या वाढदिवसाला लोक दहा वीस पाने जाहीरात देतात या बद्दल यांच्या पोटात दुखत आहे. कागल ही राजर्षी शाहूची नगरी आहे. अशा जातीयवादी प्रवृत्तीला कागलची जनता योग्य जागा दाखवेल अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कागल येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.समरजित घाटगे हे कुंडीत वाढलेले झाडयावेळी मुश्रीफ म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यानी संयम ठेवावा. त्यांना सामाजिक ऐक्य बिघडावयाचे आहे. आपण ते जपणार आहोत. राजर्षी शाहू महाराजांचे वंशज म्हणविणाऱ्या समरजित घाटगे यांनी अशा कृत्यामुळे त्यांना काय वाटत असेल. याचा विचार करावा. समरजित घाटगे हे कुंडीत वाढलेले झाड आहे अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली. आपण वडाचे झाड आहोत. हे त्यांनी लक्षात घ्यावे. असेही मंत्री मुश्रीफ म्हणाले.दरम्यान कागल शहरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गैबी चौकात मोठ्या प्रमाणात जमले होते. त्यांना घरी शांततेत जाण्याचे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले. नवीद मुश्रीफ, चद्रंकात गवळी, प्रकाश गाडेकर, प्रविण काळबर, आदी उपस्थित होते.
कागल ही राजर्षी शाहूंची नगरी, जनताच जातीयवादी प्रवृत्तीला योग्य जागा दाखवेल- हसन मुश्रीफ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 12:02 PM