कसबा बावडा : करवीर पंचायत समिती सभापतीपदी कसबा बीडचे राजेंद्र सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी करवीरचे तहसीलदार उत्तम दिघे तर प्रमुख उपस्थितांमध्ये गटविकास अधिकारी सचिन घाटगे उपस्थित होते. सूर्यवंशी हे माजी आमदार व जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील गटाचे आहेत.पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील गटाचे ७ व पी. एन. पाटील गटाचे ७ असे कॉँग्रेसचे १४ सदस्य निवडून आले आहेत. दोन्ही नेत्यांनी ठरवलेल्यानुसार पहिल्यांदा सभापती होण्याचा मान सतेज पाटील गटाच्या प्रदीप झांबरे यांना मिळाला; तर उपसभापतीपदाचा मान पी. एन. पाटील गटाच्या विजय भोसले यांना मिळाला. झांबरे यांनी राजीनामा दिल्याने ही निवड घेण्यात आली.सकाळी साडेदहा वाजता राजेंद्र सूर्यवंशी यांनी उमेद्वारी अर्ज दाखल केला. त्यांना विजय भोसले सूचक होते. दुपारी दोन वाजता निवडीची प्रक्रिया सुरू झाली. सर्व सदस्य, सदस्या पांढऱ्या रंगाचे फेटे बांधून सभागृहात हजर झाले. राजेंद्र सूर्यवंशी यांचा एकमेव अर्ज आल्याने तहसीलदार उत्तम दिघे यांनी त्यांची सभापतीपदी निवड झाल्याचे घोषित केले. या निवडीनंतर सूर्यवंशी यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.या निवडीनंतर राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले, पी. एन. पाटील यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरविन. जिल्हा परिषदेमध्येसुद्धा माझा आवाज उठेल. पी. एन. पाटील यांना आमदार करण्याचे काम आतापासूनच सुरू झाले आहे.यावेळी प्रभारी सभापती विजय भोसले, माजी सभापती प्रदीप झांबरे, जि. प. सदस्य बाळासाो खाडे, पं. स. सदस्य कृष्णात धोत्रे, सागर पाटील, बीडिओे सचिन घाटगे यांनी नूतन सभापती यांचा सत्कार केला.कागल पंचायत समितीच्या सभापतीपदी मुश्रीफ गटाच्या (राष्ट्रवादी काँग्रेस) राजश्री राजेंद्र माने यांची तर उपसभापतीपदी मंडलिक गटाचे विजय महादेव भोसले यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार शिवाजी गवळी यांनी काम पाहिले. यावेळी गटशिक्षण अधिकारी गणपती कमळकर उपस्थित होते.सकाळी अकरा वाजता राजश्री माने यांनी सभापती तर विजय भोसले यांनी उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केले. या वेळेत दुसरा कोणताच अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. गवळी यांनी सभापती माने व उपसभापती भोसले यांचा सत्कार केला. यावेळी पंचायत समितीच्या बाहेर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, सदाशिव मंडलिक साखर कारखान्याचे संचालक विरेंद्र मंडलिक, भैय्या माने, जि. प. सदस्या शिल्पा खोत यांच्या उपस्थितीत सत्कार कार्यक्रम झाला. स्वागत रमेश तोडकर यांनी केले. आभार राजेंद्र माने यांनी केले.
कागल सभापतीपदी माने, करवीरला राजेंद्र सुर्य$वंशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 12:28 AM