जहांगिर शेख --कागल --कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे विद्यापिठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्याचे मुख्या राजकीय केंद्र कागल शहरच असते. कागल शहराचा नगराध्यक्ष कोणाचा? याकडे तालुक्याचे लक्ष असते. त्यामुळे दरवेळी प्रमाणे नगरपालिका निवडणुकीची तयारी राजकीय गटांच्यातून केली जात आहे. कागल शहराच्या राजकारणावर गेली दहा वर्षे एकहाती वर्चस्व राखून असलेले आमदार हसन मुश्रीफ आणि कागल शहराच्या राजकारणात प्राबल्य असणारा स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे गट या दोन गटांच्या भुमीका काय राहणार? यावबर आगामी निवडणुक रंगणार आहे. राजे-मुश्रीफ गटाची आघाडी की बिघाडी या मुद्द्यावरच राजकीय कुरुक्षेत्राची मांडणी होणार आहे.सध्या नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू आघाडीचे संयुक्त सत्ता आहे. पाच वर्षापूर्वी म्हणजे २०११ मध्ये राजे विक्रमसिंह घाटगे आणि तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकत्र निवडणुक लढवून विरोधी तात्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक, माजी आमदार संजय घाटगे, यांच्या आघाडीचा पराभव केला होता. त्यावेळी विरोधी आघाडीतून दोन नगरसेवक निवडून आले होते. २००६-२०११ च्या पंचवार्षिक निवडणुकीत तात्कालीन मंडलीक गटाने राजे गटाचा पराभव करीत पहिल्यांदाच शहरात वर्चस्व निर्माण केले होते. २००६ पासून मुश्रीफांची एक हाती सतत पालिकेत आहे. जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडले जाणारा असे धोरण आगामी निवडणुकात अंमलात येण्याचे संकेत मिळत आहेत. यापुर्वी दोन वेळा कागल शहरातनू थेट नगराध्यक्षपदासाठी लोकांनी मतदान केले आहे. त्यामध्ये २००१ मध्ये कांचनमाला घाटगे या राजे गटांच्या नगराध्यक्ष निवडून आल्या. तर १९७४ च्या दरम्यान जी. एच. शिंदे निवडून आले होते. शिंदेंना कै. बाळ महाराजांचा पाठींबा होता. १९७८ ला विक्रमसिंह घाटगे आमदार झाले तेथून कागल शहरात राजे गट विरुद्ध मंडलीक गट असा राजकीय संघर्ष सुरु झाला. तत्पुर्वी डी. ए. घाटगे विरुद्ध वाय. डी. माने असे गट लढत असून एकुणच कागलच्या राजकरणावर १९८० नंतर २००६ पर्यंत विक्रमसिंह घाटगेंचे एकहाती वर्चस्व होते. १९८६ मध्ये राजे गटाच्या २० पैकी १९ जागा तर व्ही. ए. घाटगे मंडलीक गटाचे एकटेच निवडून आले होते. १९९१ मध्ये राजे-मंडलिक १३-१३ असे समान नगरसेवक निवडूण आले. आणि चिठ्ठीवर व्ही. ए. घाटगे नगराध्यक्ष झाले. तर १९९६ ला पुन्हा राजे गटाने सत्ता मिळवीली मात्र मुश्रीफांनी तीन सदस्य फोडून मंडलीक गटाचा नगराध्यक्ष केला. हा थोडक्यात इतिहास पाहिला तर राजे गट आणि मुश्रीफ गट यांच्या भोवतीच शहराचे राजकारण केंद्रीत झाले आहे. नाही म्हणायला मंडलीक गटाची ही भरावी अशी ताकद तयार झाली आहे. संजय घाटगे गट, भाजपा, शेतकरी संघटना, आर. पी. आय. यांचे ही कार्यकर्ते सक्रीय आहेत. राजे मुश्रीफ गट पुन्हा एकत्र लढणार की स्वतंत्र भुमीका घेणार यावर इतर गटांच्या भुमीका ठरणार आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवादीवर आणि दावेदारीवर आघाडी की बिघाडी निश्चित होणार आहे.
मुश्रीफ-घाटगे गटाच्या भूमिकेवर कागलचे राजकारण
By admin | Published: June 01, 2016 12:36 AM