कोल्हापूर : आधीच उल्हास त्यात फाल्गून मास अशीच कांहीशी अवस्था कागल ते सातारा या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाची झाली आहे. तब्बल साडेतीन हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित धरून निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू होऊन दोन महिने झाले तरी अजून प्रत्यक्षात निविदा उघडू शकलेली नाही. गुरुवारी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. आता ही निविदा १८ जानेवारीला उघडली जाणार आहे.
कागल ते सातारा या चारपदरी रस्त्याचे काम २००५ मध्ये पूर्ण झाले आहे; पण त्यानंतर वाढलेली वाहतूक लक्षात घेऊन विस्तारीकरणाचा निर्णय पुढे आला. त्यानुसार २०१५ पासून याचे सहापदरीकरण करण्याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू झाली. तब्बल २३ वेळा निविदा निघूनही प्रत्यक्षात ती कधी खुली झाली नाही आणि कामाला सुरुवातही झाली नाही.
अखेर हा मार्ग राज्य महामार्ग प्राधिकरणकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला आणि स्वत: रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दोन टप्प्यांत साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी याला लावून काम लवकर सुरू करण्याची घोषणा केली. या घटनेला दोन महिन्यांचा कालावधी होऊन गेला तरी अजून निविदा उघडण्यापर्यंतच घोडे अडले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला ही निविदा नवी दिल्लीत निघणार असल्याचे सांगण्यात आले होते; पण तांत्रिक कारण पुढे करीत ही प्रक्रिया २३ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.
कामे वेगाने होणे अपेक्षीत
मुळातच सातारा ते कागल हा मार्ग २०१९ पासून मोेठ्या प्रमाणावर पूरबाधित पट्ट्यात आला आहे. पुलांची उंची वाढविणे, बोगदे तयार करणे, नवीन पुलांची उभारणी करणे, भराव कमी करणे आधी किचकट कामे पावसाळ्यापूर्वी करणे अपेक्षित आहे. पण, अजूनही हे काम निविदा प्रक्रियेतच अडकल्याने निदान यावर्षी या कामाला मुहूर्त लागणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२०१९ आणि २०२१ प्रमाणे पुढील वर्षी देखील पुन्हा महापूर आला तर हा महामार्ग पुन्हा पाण्याखाली जाणार आहे. महामार्ग पाण्याखाली जाण्याची किंमत मोठ्या प्रमाणावर चुकवावी लागत असल्याचा पूर्वानुभव पाहता हे काम वेग घेणे अपेक्षित आहे.