दत्ता पाटील म्हाकवे : पिराचीवाडी ता. कागल येथे बोगस मतदान झाल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार समरजित घाटगे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे. मात्र असा बोगस मतदानाचा कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे मतदान केंद्रावरावरील अधिकाऱ्यांनी लोकमत'शी बोलताना सांगितले. पिराचीवाडीत १३९० इतके मतदार असून येथील दोन मतदान केंद्रावर अत्यंत सुरळीतपणे मतदान प्रक्रिया सुरू आहे. पहिल्याच सञात मतदारांचा उत्तम प्रतिसाद असल्याचेही मतदान अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, समरजित घाटगे यांनी बोगस मतदानाचा केलेला आरोप तथ्यहीन असून शहानिशा करूनच आरोप करावेत. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि विकासाचे मॉडेल म्हणून राज्यात नावलौकिक मिळविलेल्या पिराचीवाडी गावची नाहक बदनामी करु नये अशीही विनंतीही ग्रामस्थांनी केली आहे.
''विधानसभेचा अर्ज दाखल केल्यापासून समरजित घाटगे यांनी आपल्या गावाला एकदाही भेट दिलेली नाही. उलट यापूर्वी येथील सुरू असणाऱ्या विकासकामात त्यांनी खोडाच घालण्याचा प्रयत्न केला आहे. येथे लोकशाही मार्गाने अत्यंत सुरळीतपणे मतदान सुरू आहे. - सुभाष भोसले, माजी सरपंच पिराचीवाडी