कोल्हापूर : मुगळी (ता. कागल) येथील युवा शास्त्रज्ञ प्रवीण सुरेश कांबळे यांची कागल ते लंडन घेतलेली झेप निश्चितच कौतुकास्पद आहे, त्यांनी कोल्हापूर विभागासाठी स्वतंत्र सॅटेलाईट बनविण्याचा संकल्प केला असून येत्या सहा महिन्यांत तो पूर्ण करण्याचा मानस पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.प्रवीण यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला, वडील हातमागावर तर आई शेतमजुरी करायची, त्यामुळे आजोबांनी त्यांना देवर्डे (ता. आजरा) येथे शिक्षणासाठी नेले. चौथीला शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला आणि कागलच्या नवोदय विद्यालयात प्रवेश घेतला.
दहावीत असताना पेस्टालॉजी इंटरनॅशनल व्हिलेज इन्स्टिट्यूट, लंडनने देशातील तीन विद्यार्थ्यांची निवड केली. बारा हजार विद्यार्थ्यांतून प्रवीण यांना संधी मिळाल्यानंतर संधीचे सोने करण्याचे ठरविले. ‘आयबी’बोर्डातून अकरावी व बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर इंजिनिअरिंगची पदवी घेतली. विशेष म्हणजे तेथील आरोग्यमंत्र्यांचे ‘ओएसडी’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
नवतंत्रज्ञान अवगत करून काहीतरी नवीन करण्याची इच्छा होती. त्यातूनच डिसेंबर २०१७ मध्ये ‘इस्रो’ला गेलो. इतर मित्रांच्यासोबत सॅटेलाईट बनविण्याचा संकल्प केला. वातावरणातील ओझनचा थराची तीव्रतेबाबत सॅटेलाईटच्या माध्यमातून माहिती गोळा केली, ती ‘युनो’कडे दिली. भारतामध्ये ओझन वायूचा थर पातळ होत गेल्याचा आम्ही अहवाल दिल्यानंतर सन २०१८ ला प्लास्टिक बंदी घालण्यात आल्याचे प्रवीण कांबळे यांनी सांगितले.कोल्हापुरातील महापूर आणि नागरिकांची उडालेल्या तारांबळीने मन हेलावून गेले. त्याचवेळी केवळ कोल्हापूर विभागासाठी सॅटेलाईट बनविण्याचा संकल्प केला. हा माझा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. ‘इस्रो’च्या माध्यमातून हा सॅटेलाईट सोडणार असून किमान दहा वर्षे तो आकाशात कार्यरत राहील. यासाठी अडीच कोटी खर्च अपेक्षित असून त्यासाठी शासन पुढे येईल. हा पहिलाच प्रयोग असणार आहे, त्यामुळे कोणत्याही नैसर्गिक संकटावेळी अद्ययावत माहिती मिळण्यास सोपे जाईल, असेही कांबळे यांनी सांगितले.दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सोमवारी जिल्हा बॅँकेत प्रवीण कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक भैया माने, आसिफ फरास, सर्जेराव पाटील-पेरिडकर, प्रवीणसिंह भोसले, किशोर शहा, अतुल जोशी आदी उपस्थित होते.कमी आवाजाची प्लार्इंग कार बनविणारयापूर्वी मानवविरहीत प्लार्इंग कार बनविल्या आहेत. मात्र, कमी आवाजाच्या कार बनविण्याचा आमचा संकल्पही प्रवीण कांबळे यांनी बोलून दाखविला.