दत्तात्रय पाटील ल्ल म्हाकवेकागल तालुक्यातील मतदारांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पंचायत समितीमध्ये सत्तेची वाटणी बरोबरीत दिली आहे. त्यामुळे सभापती-उपसभापती निवडीतही दोन्ही पक्षांनी सत्तेची समान वाटणी करून निवडी कराव्यात, अशी येथील नागरिकांची मानसिकता आहे. राधानगरी, भुदरगडच्या धर्तीवर आता कागलमधील सभापती निवड होणार की दोन्ही पक्ष चिठ्ठीद्वारे आपले नशीब आजमावणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.२०१२ च्या निवडणुकीत भुदरगड पंचायत समितीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी ४ जागा निवडून आल्याने दोघांनाही सत्तेत सहभागी करण्यात आले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे माजी आमदार के. पी. पाटील व काँग्रेसचे माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना प्रत्येकी सव्वा वर्षे सभापती, उपसभापती करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे पाच वर्षांत कार्यकर्ते आणि पदाधिकारी गुण्यगोविंदाने राहिले होते. तशीच परिस्थिती राधानगरी तालुक्यात उद्भवली होती. तेथे काँग्रेस, राष्ट्रवादी व जनता दलाने एकत्रित येऊन सत्ता स्थापन करून सर्वांनाच संधी उपलब्ध करून दिली होती. कागल तालुक्यात सभापती निवड चिठ्ठीवर झाली, तर यापुढील काळात कोणतेही कामकाज करताना अथवा निर्णय घेताना ठराव (बहुमत) घेण्याची परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे सर्वांना सत्तेत सहभागी करून एकत्रितपणे काम करणे हितावह ठरणार आहे, असे मत तालुक्यातील अनुभवी व्यक्तींतून व्यक्त होत आहे.दरम्यान, दोन्ही पक्षांकडून सभापती निवडीच्या तडजोडी झाल्या, तर आरक्षणाप्रमाणे राजश्री माने (कसबा सांगाव), मनीषा संग्राम सावंत (बानगे), कमल रघुनाथ पाटील (कापशी) यांना पहिल्या अडीच वर्षांत सभापतींचा बहुमान मिळणार आहे.
कागलला ‘चिठ्ठी’ की ‘समझोता’
By admin | Published: March 07, 2017 12:17 AM