कोल्हापूर : मागील (२०२२-२३) गळीत हंगामातील एफआरपी सोडून ५० व १०० रुपये देण्याच्या आश्वासनांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विसर पडला असून, शक्तिपीठ महामार्गाच्या आडून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचे षडयंत्र आखले जात आहे. याविरोधात राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंतीदिनी बुधवारी जनकस्थळ (कागल) ते स्मृतिस्थळ (कोल्हापूर)पर्यंत ‘कैफियत’ पदयात्रा काढणार असल्याची माहीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.राजू शेट्टी म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीमुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती झाली, त्यांची शतकोत्तर सुवर्ण जयंती मोठ्या धामधुमीत साजरी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याबद्दल आम्हाला आनंदच आहे; पण त्यांच्या विचाराने सरकारचे काम सुरू आहे का? मागील गळीत हंगामात साखरेचे दर चांगले राहिल्याने एफआरपी सोडून साखर कारखान्यांकडे जादा पैसे राहिले होते. ते पैसे मिळावेत, यासाठी राष्ट्रीय महामार्ग रोखला होता, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत तोडगा काढला होता. ज्या साखर कारखान्यांनी तीन हजार पेक्षा कमी पैसे दिले आहेत, त्यांनी शंभर तर तीन हजार पेक्षा जास्त दिलेल्या कारखान्यांनी ५० रुपये शेतकऱ्यांना देण्याचे ठरले होते. अनेक कारखान्यांनी साखर आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवले आहेत, सरकारकडून त्याला मान्यता दिली जात नाही. त्याचबरोबर कोणाचीही मागणी नसताना शक्तिपीठ महामार्गाचे घाट घातला जात आहे. एकीकडे शेतकऱ्यांना चिरडायचे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी शेतकऱ्यांना उभे करण्याचे काम केले, त्या राजर्षी शाहू महाराजांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी केली जात आहे.
सरकारची संवेदनशीलता संपली असून, त्याला जाग आणण्यासाठी कागल ते कोल्हापूर ‘कैफियत पदयात्रा’ काढणार आहे. ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, जनार्दन पाटील, वैभव कांबळे आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांची दीडशे मुले सहभागी होणारबुधवारी सकाळी आठ वाजता राजर्षी शाहू महाराज यांच्या कागल येथील जन्मस्थळाला अभिवादन करून कैफियत पदयात्रेला सुरुवात होणार आहे. दुपारपर्यंत कोल्हापुरात येणार असून, यामध्ये शेतकऱ्यांची दीडशे मुले सहभागी होणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
दादांनी नुसते बोलू नये, विषय संपवावाशक्तिपीठाचा प्रश्न संपवल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील सांगत आहेत. त्यांनी नुसते बोलू नये. महामार्ग रद्द करून तो विषय संपवावा, असा टोला शेट्टी यांनी हाणला.
पदयात्रेने काहीतरी पदरात पडतेचयापूर्वी पंढरपूरला विठ्ठलाला साकडे घालून बारामतीपर्यंत यासह अनेक पदयात्रा काढल्या त्या त्यावेळी शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी पडले आहे. प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर निश्चित यश मिळते, याही वेळेला काहीना काही पदरात पडेल, असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला.