एक गुंता सुटतोय तेवढ्यात नवा महागुंता समोर आला आणि कमळवाल्यांनी मुंबई गाठली. दिल्लीच्या तख्ताकडून महाराष्ट्रात येणारं वारं (मोसमी किंवा मतलई वारं नव्हे, तर ‘मतलबी’ वारं!) जोरजोरानं वाहू लागल्यानं यंदा कमळाचा अचानक सुरू झालेला सुगंध हुंगण्यासाठी (आणि जमलंच तर पसरवण्यासाठी) भुंग्यांची रांग लागलीय. सांगली जिल्ह्यात तर संजयकाकांनी या वाऱ्यासोबत लाट आणलीय. त्यामुळं भुंग्यांच्या गर्दीत रोज नव्यानं भर पडतेय. सांगली, जतमध्ये तर कमळाभोवती घोंगावणाऱ्या भुंग्यांमुळं पाकळ्या झडायची वेळ आलीय. खानापूर, शिराळा, पलूस-कडेगाव, मिरज, तासगाव-कवठ्यात कमळावर धनुष्यबाणानं नेम धरलाय. राजूभार्इंच्या शिट्ट्याही तिथं जोरजोरात वाजायला लागल्यात. कमळाच्या बागेत उसाचं हमखास पैका मिळवून देणारं आंतरपीक घेण्याचं ठरवलेल्या राजूभार्इंच्या शिट्ट्या कमळाभोवती पिंगा घालणाऱ्या भुंग्यांना हाकलायला, त्यांच्याच कानात ‘घोंऽऽघोंऽऽ’ घुमायला लागल्यात. खानापुरात गोपीचंद पिवळाधम्मक भंडारा सोडून भगवा टिळा लावण्यासाठी सहा महिन्यांपासून कमळाला खुणावतोय. तख्तावर बसून कमळाचा सुगंध अनुभवण्याची स्वप्नं आता कुठं समोर आलेली दिसायला लागलीत, पण महागुंता वाढलाय! म्हणून ही मंडळी मुंबईच्या मार्केटचा अंदाज घ्यायला, बुकिंग पक्कं करायला, अॅडव्हान्स उचलायला आणि दर ठरवायला तिथं गेलीत. सांगली-जतचा प्रश्न मुंबई मार्केटच्या गळी उतरवण्याची जबाबदारी काकांकडं आलीय. ‘काका, मला वाचवा’ म्हणून सगळ्यांनी साकडं घातल्यानं काका टेम्पो भरून तिकडं गेलेत.नरेंद्रभाई आणि अमितभार्इंची एन्ट्री झाल्यापासून कमळाच्या मार्केटपर्यंत नेणाऱ्या व्यापाऱ्यांची, एजंटांची नुसती गर्दी उसळल्याचं काहींनी हातातली घड्याळं सोडत सांगितलं. (घोरपडे सरकार, जगतापसाहेब, माधवनगरचे पप्पूशेठ यांना विचारायला हवं!) संजयकाकांनी सांगलीत पवारांच्या पैलवानांना कुठल्याही परिस्थितीत कमळाभोवती फिरकू द्यायचं नाही, असं ठरवलंय. दिनकरतात्या आणि श्रीनिवासरावांनी कमळाचा नाद सोडल्याचं परवा सुरेशअण्णा कुणाला तरी सांगत होते. त्यामुळं काकांनी सुधीरकाका, धनपालतात्या, पप्पूशेठ, तांबवेकर वीटवाले यांना संधी देण्याची गळ घातलीय. नीताताईही त्यांना सामील झाल्यात. जतच्या शेंडगेअण्णांनी कमळाच्या तलावाभोवती बसून ‘हात’ हातात घेण्याचा प्रयत्न केल्यानं काका त्यांच्यावरही नाराज आहेत, म्हणून जतच्या जगतापसाहेबांना काकांनी सोबत घेतलं.‘भल्या बुद्धीचे सागर नाना’ अर्थात फडणवीस भाऊ आणि येता-जाता अजितदादांना ‘आत’ टाकण्याचा ‘विनोद’ करणाऱ्या तावडे महाराजांपुढं सगळेजण बसले, पण त्या दोघांनीही सांगली-जतचे राखणदार कुठं आहेत, असं विचारलं. सांगली-जतमध्ये कमळाच्या तलावाची राखण पवार पैलवान आणि शेंडगेअण्णा आधीपासून करत असल्यानं त्यांनाही बोलावण्याचा खलिता धाडण्यात आला. अखेर ते दोघं धापा टाकत समोर आले. पण काकांनी आधीच ‘केम छे?’ अशी विचारपूस करत अमितभार्इंना कोल्हापुरात मनसोक्त ढोकळा, फाफडा खिलवला होता. त्यामुळं बैठकीत फडणवीस भाऊ आणि तावडे महाराजांना अमितभार्इंचा ‘मेसेज’ आला, ‘काकांचा शब्द अंतिम ठरवा, हवं तर त्यांना सर्वांच्या समोर विचारा...’बुद्धिमान फडणवीसांनी डोकं चालवलं आणि काकांना सर्वांसमोरच प्रश्न केला, ‘कमळाची राखण करणाऱ्यांना संधी देण्याचं धोरण ठरलंय. धोरणाविरोधात जायचं का नाही, ते तुम्ही ठरवा. पवारांचे पैलवान आणि शेंडगेअण्णांचं नाव पक्कं करावं का?’ काकांची पंचाईत झाली. ते डोळे मिटून विचारात गर्क झाले... मग मान हलवू लागले... दोघांना होकार की नकार, तेच कळेना. फडणवीस भाऊ खुलले. काकांचा होकार समजून आपलं साधलं, असं वाटून ते काही बोलणार, तेवढ्यात तावडे महाराजांनी त्यांचा हात दाबला. काकांचा नकार फक्त त्यांनाच कळला होता म्हणे! त्यांनी फडणवीस भाऊंच्या कानात अमितभार्इंच्या ‘मेसेज’ची आठवण करून दिली... काकांनी काही बोलण्यापूर्वीच बैठक संपवली गेली.दुसऱ्या दिवशी निर्णय जाहीर झाला. पवारांचे पैलवान आणि शेंडगेअण्णांचा पत्ता कापण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. काका मात्र चक्रावले. ‘आपण काहीच निर्णय दिला नव्हता. मग असं कसं घडलं?’ ते विचारात पडले... थकले... अखेर त्यांनी विचार सोडून दिला. ताजा कलम : कालच जगतापसाहेबांशी काका फोनवर बोलत होते, ‘तेवढं देशी औषधाचं बघा की, हलून-हलून मान दुखायला लागलीय...’- श्रीनिवास नागे
काका, मला वाचवा!
By admin | Published: September 23, 2014 11:43 PM