बंगलोर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रविवारी रात्री आपल्या २१८ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये निपाणीतून काकासाहेब पाटील, चिकोडी-सदलगामधून गणेश हुक्केरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.याशिवाय कागवाड विधानसभा मतदारसंघातून अथणी शुगर्सचे श्रीमंत बाळासाहेब पाटील यांना, कुडची (राखीव)मधून अमित शामा घाटगे, रायबाग (राखीव)मधून प्रदीपकुमार माळगी, अथणीमधून महेश इरगोंडा कुमठळ्ळी, हुक्केरीतून ए. बी. पाटील, आरभावीतून अरविंद महादेवराव दलवाई, गोकाकमधून रमेश जारकीहोळी, यमकणमर्डी (राखीव) सतीश जारकीहोळी, बेळगाव उत्तरमधून फिरोज सेठ, बेळगाव दक्षिणमधून एम. डी. लक्ष्मीनारायण, बेळगाव ग्रामीणमधून लक्ष्मी हेब्बाळकर, खानापूरमधून अंजली निंबाळकर, बैलहोंगलमधून महांतेश कौजलगी, सौंदत्ती यल्लम्मातून विश्वास वसंत वैद्य, रामदुर्गमधून पी. एम. अशोक, मुधोळ (राखीव) मधून सतीश बंडीवड्डर यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. जमखंडीतून सिद्धू न्यामगोंडा, तेरदाळमधून उमाश्री, बदामीमधून डॉ. देवराज पाटील, बिळगीमधून जगदीश तिम्मणगौडा पाटील, बागलकोटमधून हुल्लाप्पा मेती, मुद्देबिहाळमधून आप्पाजी नाडगौडा, विजापूर शहरमधून अब्दुल हमीद मुश्रीफ काँग्रेसचे उमेदवार असतील.२२४ सदस्यीय कर्नाटक विधानसभेसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे. काँग्रेसने कित्तूर, शिंदगी, नागठाण, रायचूर, मेलूकोटे आणि वादग्रस्त शांतीनगर या सहा जागांचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. यातील मेलूकोटे येथे स्वराज इंडियाचे उमेदवार दर्शन पुतनय्या यांना काँग्रेस पाठिंबा देण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना चामुंडेश्वरी मतदारसंघाचे तिकीट देण्यात आले आहे. तेथे त्यांची लढत निधर्मी जनता दल आणि भाजपच्या उमेदवाराशी होईल. भाजपने त्यांच्या पराभवाचा चंग बांधला आहे त्यामुळे सुरक्षित मतदार संघ म्हणून बागलकोट मतदारसंघातूनही सिद्धरामय्या यांनी निवडणूक लढवावी असे पक्षश्रेष्ठी तसेच बहुतांशी कार्यकर्त्यांचे मत होते, मात्र त्याला ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली यांनी आक्षेप घेतल्याने चामुंडेश्वरी या एकाच मतदारसंघातून लढण्याचा निर्णय सिद्धरामय्या यांनी घेतला आहे. त्यांचे सुपुत्र यतिंद्र यांना वरुना मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सिद्धरामय्या यांनी २००८ आणि २०१३ मध्ये केले आहे.
निपाणीतून काकासाहेब पाटील काँग्रेसचे उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 1:01 AM