कळंबा : करवीर तालुक्यातील यशवंतग्राम, निर्मलग्राम पुरस्कार विजेत्या कळंबा ग्रामपंचायत हद्दीत कधीकाळी जवळपास दोनशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे प्रशासन चिंतेत होते. परंतु, ग्रामपंचायत हद्दीत कोरोना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. सध्या तीस रुग्ण उपचार घेत आहेत.
कळंबा ग्रामपंचायत परिसरात कोरोनाचा प्रसार आणि संसर्ग रोखण्यासाठी पंचायत समिती सभापती मीनाक्षी पाटील, सरपंच सागर भोगम, उपसरपंच विजय खानविलकर, ग्रामविकास अधिकारी डी. व्ही. तेलवी व प्रशासनाने प्रभागनिहाय विशेष समित्या तयार करून कोरोना कामकाजाविषयी दैनंदिन माहिती संकलित केली. ग्रामस्थांना मास्क, सॅनिटायझर ,सुरक्षित अंतराच्या नियमांची जनजागृती करण्यात आली.
गावठाण, वाड्यावस्त्या,परिसर वारंवार निर्जंतुकीकरण करणे, प्रतिबंधात्मक क्षेत्रात प्रवेश नाकारणे, आठ दिवसांची संचारबंदीची कडक अंमलबजावणी, स्वतंत्र अलगीकरण कक्ष उभारणी, बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई, व्यावसायिकांची कोरोना तपासणी यांसारखे उपक्रम राबवून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न केले.
कळंबा ग्रामपंचायत हद्दीत स्थानिक नागरिकांबरोबरच नोकरी व्यवसायानिमित्ताने हजारो नागरिक वास्तव्य करत आहेत. त्यांची घरोघरी आरोग्य तपासणी करण्यात आली असून, संशयित नागरिकांना तत्काळ पुढील उपचारासाठी रुग्णालयात अलगीकरण कक्षात पाठवले जात आहे. कळंबा ग्रामपंचायत परिसरात कोरोना प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांना थोडेफार का होईना यश मिळाले आहे.