कोल्हापूर : राज्यातील महत्वाच्या कारागृहांपैकी एक असलेल्या येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहात गेल्या दहा दिवसात मोबाईलसह बॅटऱ्या, पेनड्राईव्ह, गांजा सापडल्याच्या घटना लागोपाठ घडल्या. अतिसुरक्षित व्यवस्था, भक्कम तटबंदीला भगदाड पाडून या वस्तू कैद्यांपर्यंत पोहोचतात. गेल्या चार-पाच वर्षात अशा अनेक घटना घडल्या, त्यांचे व्हिडीओही व्हायरल झाले, कर्मचाऱ्यांच्या बदल्याही झाल्या. परंतु, त्यानंतरही या घटना थांबलेल्या नाहीत. त्यामुळे या कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कळंबा कारागृहात कोल्हापूरसह मुंबई, पुणे व राज्यातील तसेच परराज्यातील कैदी आहेत. या कारागृहात गंभीर गुन्ह्यांसह जहाल, धोकादायक कैदी तसेच मोक्कांतर्गत २५ टोळ्यांमधील साडेचारशेहून अधिक गुंड आहेत. मात्र, सद्यस्थितीत या कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे निघत आहेत. कारागृहात ओल्या-गांजा पार्टी चालतात, कैदीही मोबाईल वापरतात, त्याचे चार्जिंगही करुन दिले जाते, त्यासाठी कैद्यांकडून काही कर्मचारी आर्थिक मोबदला घेतात, असा आरोप २०१५मध्ये जामीनावर सुटलेल्या कैद्याने केला होता. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला. यावरुनच कारागृहाची सुरक्षा किती ‘भक्कम’ आहे, ते दिसते.
गेल्या दहा दिवसात कारागृहातील तीन घटनांमध्ये १२ मोबाईलसह बॅटऱ्या, पेनड्राईव्ह, गांजा कैद्यांपर्यंत पोहोचल्याचे स्पष्ट झाले. भाजीपाला, बांधकाम साहित्यातून तसेच बुटातूनच मोबाईल लपवून सुरक्षा व्यवस्था भेदल्याचे स्पष्ट झाले. अधिकारी रजेवर अथवा बदलीवर गेल्यानंतरच नवीन अधिकाऱ्यांच्या झडतीत मोबाईल सापडल्याच्या घटना घडतात. त्यामुळे येथील अधिकारी व सुरक्षा रक्षकांच्या राजकारणाचाही फटका सुरक्षा व्यवस्थेला बसत आहे.
क्षमतेपेक्षा अधिक कैदी, कमी सुरक्षा
कळंबा कारागृहाची कैदी ठेवण्याची क्षमता १,७८९ आहे, प्रत्यक्षात याठिकाणी सुमारे २,४०० कैदी आहेत. तसेच ४० बराक असून, १० अंडा सेल आहेत. या कारागृहासाठी १५८ अधिकारी व कर्मचारी मंजूर असताना प्रत्यक्षात १३७ कर्मचारीच कार्यरत आहेत.
तीन अधिकारी, २८ कर्मचाऱ्यांची बदली
२०१६मध्ये कारागृहात गांजा पार्टीसह मोबाईल सापडल्याबद्दल अक्षीक्षकांसह १२ सुरक्षा रक्षकांचे निलंबन झाले, तर २०१९मध्ये कैदी संतोष पोळने बनावट रिव्हॉल्व्हरचा व्हिडीओ व्हायरल केल्याने १६ कर्मचारी निलंबित झाले. तीन तुरुंग अधिकाऱ्यांसह १५ कर्मचाऱ्यांची चौकशीही झाली.
मोबाईल सापडतात, सीमकार्ड गायब
कारागृहात मोबाईल सापडतात, सीमकार्ड नाही यात काहीतरी गौडबंगाल आहे. सीमकार्ड सापडल्यास कॉल डिटेल्स, किती दिवस वापरले आदी रेकॉर्ड पोलीस तपासात उजेडात येईल, यासाठी सीमकार्डच नष्ट केले जात असल्याची चर्चा आहे.
पुण्यातील कैद्यांकडे संशयाची सुई
दीड महिन्यांपूर्वी चेंडूत गांजा भरुन फेकताना पुण्यातील तीन युवक सापडले. त्याचा तपास सुरु असतानाच दहा दिवसांपूर्वी चारचाकीतून आलेल्या युवकांनी कारागृहात मोबाईल, गांजाचे गठ्ठे फेकले. हे वाहन पुन्हा पुण्याच्या दिशेने गेल्याचे किणी टोल नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आले.