कळंबा : गेले दोन दिवस सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता कळंबा तलाव पूर्णक्षमतेने भरून सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला.
तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहू लागल्याचे वृत्त सोशल मीडियावर झळकू लागताच तरुणाईचे जथ्थेच्या जथ्थे तलावाकडे वळू लागले.
जूनच्या अखेरीस झालेल्या दमदार पावसाने अवघी बारा फुटांवर स्थिरावलेली पाणीपातळी वीस फुटांवर पोहोचली होती. जुलैच्या सुरवातीच्या पंधरावड्यात पावसाने हुलकावणी दिल्याने तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहण्याची आस कोरडी राहिली होती. मात्र, गेले दोन दिवस सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे तलावाचे मुख्य स्तोत्र कात्यायनी टेकड्यातून वाहणारे सात नैसर्गिक नाले पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहू लागल्याने अखेर मंगळवारी सायंकाळी तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला.
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सायंकाळी पाचनंतर संचारबंदी घोषित करण्यात आली असून, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तलावातील सांडव्याचे दगड कोसळू लागले आहेत. सांडव्यानजीकचा पूल कंप पावत आहे. बंधारा खचला असून पदपथ निसरडा बनला आहे. मनोऱ्याला संरक्षक कठडा नसल्याने परिसर धोकादायक बनला आहे. पथदिवे नसल्याने परिसरात अंधार आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधता बाळगण्याचा इशारा पालिका प्रशासन, कळंबा ग्रामपंचायत, करवीर पोलीस प्रशासनाने दिला आहे.
फोटो : २० कळंबा तलाव
गेले दोन दिवस सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने कळंबा तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन पाणीपातळी सत्तावीस फुटांवर गेल्याने मंगळवारी सायंकाळी कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला.