अमर पाटील कळंबा: दमदार पावसामुळे कळंबा तलावाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहायला सुरवात झाली. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ आणि फोटो झळकू लागल्याने पर्यटकांनी गर्दी केली. तलावाचे मुख्य जलस्तोत्र असणारे कात्यायनी टेकड्यातुन वाहणारे सातही नैसर्गिक नाले पुर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागल्याने तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. मोठया सांडव्यानजीकच्या लहान सांडव्यातून ही पाण्याचा मोठा विसर्ग वाढला आहे. एकंदरीत जुलैच्या मध्यापर्यंत अवघी चार फुटांवर स्थिरावलेली पाणीपातळी आठवड्याभराच्या मुसळधार पावसामुळे सत्तावीस फुटांवर गेली. तलाव भरल्याने उपनगरे व लगतच्या ग्रामीण जनतेच्या पाण्याची चिंता मिटल्याने ग्रामस्थांसह प्रशासनाकडून समाधान व्यक्त होत आहे. पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी तलावाच्या मनोऱ्यानजीकचा पदपथ निसरडा झाला असून धोकादायक मनोऱ्याचे लोखंडी संरक्षक कठडे तुटले आहेत. सेल्फी काढण्याच्या नादात अनुचित प्रकार जीवावर बेतण्याची शक्यता असल्याने हौशी पर्यटकांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. हौशी पर्यटकांनी ओसंडून वाहणाऱ्या सांडव्यावरून चालत जात वाहत्या पाण्यात पोहणे टाळावे.
तलाव सांडव्यावरून ओसंडून वाहू लागल्यानंतर परिसरात पर्यटकांची गर्दी होते. अशावेळी हुल्लडबाजांचा त्रास पर्यटकांना सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिसांनी हुल्लडबाजांना पोलिसी खाक्या दाखवण्याची गरज आहे. - पूनम उत्तम जाधव, ग्रा. प. सदस्या, कळंबा