लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेल्या काळम्मावाडी धरणग्रस्तांमधील एकनाथ चौगुले यांची तब्येत बिघडल्याने त्यांना शुक्रवारी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुनर्वसन अधिकाऱ्यांनी धरणग्रस्तांसोबत बुधवारी (दि. १०) बैठक ठेवली असून त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली. मात्र धरणग्रस्तांनी त्यास नकार दिला.
काळम्मावाडी धरणग्रस्तांचे योग्यरित्या पुनर्वसन झालेले नाही या कारणास्तव गुरुवारपासून काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेच्यावतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. धरणग्रस्तांपैकी २० जण सध्या उपोषणाला बसले आहेत. शुक्रवारी यातील एकनाथ चौगुले यांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे यांनी धरणग्रस्तांना बुधवारी (दि.१०) दुपारी बारा वाजता अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांच्यासोबत बैठक लावण्यात आली असून धरणग्रस्तांनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली होती. मात्र धरणग्रस्तांनी त्यास नकार देत उपाेषण सुरुच ठेवले आहे. यातील उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली तर अन्य धरणग्रस्त उपोषणाला बसतील अशी माहिती संघटनेचे बाबूराव पाटील यांनी दिली.
--
फोटो नं ०५०३२०२१-कोल-काळम्मावाडी धरणग्रस्त
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेच्यावतीने आमरण उपोषण करण्यात येत आहे. उपोषणाचा शुक्रवारी पाचवा दिवस होता.
--