लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व आर्थिक अडचणी असतानाही येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बॅँकेने या आर्थिक वर्षात तीन हजार ८२२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्यातून ३३ कोटी रुपयांचा नफा झाला, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
बॅँकेकडे २२९१ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. १५३० कोटी रुपयांची कर्जे, तर ६१.२५ कोटींचे भागभांडवल आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्योग, व्यापार क्षेत्रात आर्थिक मंदी निर्माण झाली. त्यामुळे थकीत कर्जवसुलीवर त्याचा विपरीत परिणाम झाला. परिणामी, बॅँकेच्या एनपीएमध्ये समाधानकारक वसुली झाली नाही. त्यातूनही रिझर्व्ह बॅँकेच्या धोरणानुसार काही कर्जदारांना रिस्ट्रक्चरचा लाभ देण्यात आला. अपेक्षित वसुली करून बॅँकेने ग्रॉस एनपीए साधारण ९ टक्के राखला आहे. या वर्षात बॅँकेने शिरगुप्पी (कर्नाटक) येथे शाखा स्थलांतरित करून ती कार्यान्वित केली. कुंभोज (ता. हातकणंगले) येथेही एक शाखा स्थलांतरित केली असून, लवकरच ती कार्यान्वित होणार आहे. ठेवीदारांचा बॅँकेवरील विश्वास, कर्जदारांनी केलेले सहकार्य यामुळेच बॅँकेने इच्छित प्रगती केली आहे. बॅँकेच्या चौफेर वाटचालीत संस्थापक अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले, तर संचालक स्वप्निल आवाडे यांनी या वाटचालीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विजय कामत, सर्व संचालक व कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले.
फोटो ओळी
०१०४२०२१-आयसीएच-०३ - प्रकाश आवाडे
०१०४२०२१-आयसीएच-०४ - स्वप्निल आवाडे