कोल्हापूर : येथील मंगळवारपेठेतील अॅड. कल्याणी माणिकराव माणगावे यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड झाली आहे. कोल्हापूरच्या युवतीला पहिल्यांदाच या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. युवक काँग्रेसची नवीन कार्यकारिणी सोमवारी (दि.८) जाहीर झाली. त्याची माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष सत्यजित तांबे यांनी त्यांच्या आणि युवक कॉँग्रेसच्या फेसबुक पेजवर जाहीर केली आहे.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसने नवीन कार्यकारिणीची निवड केली आहे. त्यामध्ये राज्यातील नवीन युवक-युवतींना संधी दिली आहे. या कार्यकारिणीमध्ये पाच प्रवक्त्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात कोल्हापूरच्या अॅड. कल्याणी माणगावे यांचा समावेश आहे. त्यांची सहा महिन्यांपूर्वी युवक काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती झाली होती.
राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील कल्याणी यांना पहिल्यांदाच या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, आमदार सतेज पाटील, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रवक्तेपदी निवड झाल्याचा खूप आनंद होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी आणि करवीर मतदारसंघातील युवतींचे संघटन करण्यावर माझा भर राहणार आहे. युवती, युवकांमध्ये समाजासाठी काम करण्याची तळमळ, नेतृत्व करण्याची क्षमता असतील, तर त्यांना पक्षात काम करण्याची संधी नक्कीच आहे. युवापिढीच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी युवती, युवकांनी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आले पाहिजे, तरच चित्र बदलणार आहे.-अॅड. कल्याणी माणगावे.
राज्यातील अन्य प्रवक्तेब्रिज किशोर दत्त (ठाणे), नयना गावीत (नाशिक), रिषिका राका (भिवंडी), बालाजी गाडे (नांदेड) आणि आनंद सिंग यांची युवक काँग्रेसच्या प्रवक्तेपदी निवड झाली आहे.