कोल्हापूर : नेहमी अडथळ्याची मालिका लागलेल्या पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम ‘रामभरोसे’ सुरू असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. कारण आज, मंगळवारी पुलाच्या भिंतीच्या स्लॅबचे काँक्रीट टाकण्यात येणार आहे; पण या महत्त्वाच्या वेळी त्यावर देखरेख ठेवण्यासाठी नवीनच अधिकाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती केली आहे. कारण एकाची बदली, दुसरा रुग्णालयात, तर तिसरा वादग्रस्त अशी अधिकाऱ्यांची अवस्था आहे.
पर्यावरण, पुरातत्त्व विभागाचे अडथळे दूर करून पर्यायी शिवाजी पुलाचे काम सुरू झाले असताना झालेल्या कामाचे बिल काढण्यावरून काही दिवस काम थांबले; पण त्यावरही तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी कृती समितीसोबत बैठक घेऊन मार्ग काढला. त्यावेळी कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांनी पुढाकार घेऊन शाखा उपअभियंता प्रशांत मुंघाटे यांच्या देखरेखीखाली आठवड्यापूर्वी मुख्य स्लॅबचे काँक्रीट टाकले. पण, त्यानंतरच आता शनिवारी कार्यकारी अभियंता कांडगावे यांची तडकाफडकी पुण्यात बदली केली. या दबावापोटी शाखा अभियंता प्रशांत मुंघाटे यांची प्रकृती बिघडल्याने ते खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.
कार्यकारी अभियंता कांडगावे यांनी अद्याप बदली होऊनही पदभार सोडलेला नाही; पण आज, मंगळवारी पुलाच्या स्लॅबच्या भिंतीचे सुमारे १०० क्युबिक मीटरचे काँक्रीट टाकण्यात येत आहे. दरम्यान, कांडगावे हे पुलाबाबत लवाद कामासाठी सोमवारी रात्री मुंबईला रवाना झाले. मुंघाटे रुग्णालयात, तर वादग्रस्त बनलेले संपत आबदार हे त्या कामाकडे फिरकत नाहीत. अशा अवस्थेत आज, मंगळवारी स्लॅबचे काँक्रीट आहे. हे तिन्हीही प्रमुख अधिकारी नसल्याने पुलाचे काम ‘राम भरोसे’ सुरू असल्याची स्थिती निर्माण झालीं आहे.देखरेखीसाठी तात्पुरते अधिकारी नियुक्तपुलाच्या कामाची देखरेख करणारे तिन्हीही अधिकारी विविध कारणांनी अनुपस्थित आहेत. आज, मंगळवारी पुलाच्या स्लॅबच्या काँक्रीटचे काम असल्याने त्यासाठी उपअभियंता रमेश पन्हाळकर आणि सहायक शाखा अभियंता चित्तेश्वर सोनटक्के यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे.