कोल्हापूर : केंद्र सरकारच्या जाचक निर्णयांविरोधात कोल्हापुरात सराफ व्यावसायिकांनी सोमवारी रात्री महाद्वार रोड येथून ‘कँडल मार्च’ काढला. दोन लाखांवरील खरेदीदारास पॅनकार्ड व फॉर्म नंबर ६० व ६१ सराफांनी ग्राहकांकडून भरून घ्यावेत व सहा वर्षे रेकॉर्ड सांभाळावे, असे जाचक निर्णय सरकारने घेतले आहेत.आॅल इंडिया जेम्स अॅण्ड ज्वेलर्स व महाराष्ट्र सराफ सुवर्णकार महामंडळ यांच्या आदेशानुसार राज्यात एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्यात सराफ व्यावसायिकांनी सोमवारी ‘कँडल मार्च’ काढण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा सराफ व्यापारी संघाशी संलग्न कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने महाद्वार रोड येथील संभवनाथ चौकातून कँडल मार्चला सुरुवात केली. जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी या मार्चचे नेतृत्व केले. भेंडे गल्ली, शिवाजी चौक, भाऊसिंगजी रोड, गुजरीमार्गे पुन्हा संभवनाथ चौकात या ‘कँडल मार्च’ची सांगता झाली. या मार्चमध्ये सेक्रेटरी कुलदीप गायकवाड, सुरेश ओसवाल, संचालक किरण गांधी, महेंद्र ओसवाल, सुशीलकुमार गांधी, धर्मपाल जिरगे, सुहास जाधव, पै. बाबा महाडिक, शिवराज पोवार, संपतराव पाटील, सुभाष ग. पोतदार, रूपचंद खे. ओसवाल यांच्यासह प्रकाश बेलवलकर, सुनील मंत्री, सतीश भोजे, स्वप्निल शहा, विजयकुमार भोसले, प्रसाद धर्माधिकारी, दिनकर ससे, चंद्रशेखर नाईक, (हुपरी), गजानन बिल्ले (राधानगरी), आदींचा सहभाग होता.राजू शेट्टींशी चर्चा; आमदार क्षीरसागरांना निवेदनकँडल मार्च झाल्यानंतर सर्व कारागीर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी गेले. त्याठिकाणी सराफ व्यापारी संघाचे पदाधिकारी व सुवर्णकारागीरांनी आपली भूमिका राजेश क्षीरसागर यांच्याकडे मांडून त्यांना निवेदन दिले. त्यानंतर खासदार राजू शेट्टी यांच्याशी फोनवरून या प्रश्नांबाबत चर्चा केली, अशी माहिती भरत ओसवाल यांनी सांगितले.
कोल्हापुरात सराफांचा ‘कँडल मार्च’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2016 12:17 AM