कांडगाव (ता. करवीर) येथील कांडगाव वि. का. स. सेवा संस्थेची ऑनलाईन ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली असून, अहवाल सालात संस्थेस १२ लाख इतका नफा झाला असून सभासदांना उच्चांकी १२ टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मेडसिंगे यांनी दिली.
कांडगाव, शेळकेवाडी, जैताळ या तीन गावांत कार्यक्षेत्र असलेल्या कांडगाव (ता. करवीर) येथील दिगंबर मेडसिंगे याच्या मार्गदर्शनाखाली कारभार सुरू असलेल्या कांडगाव विकास सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली.
या सभेत विलास पाटील, आनंदराव मगदूम, अशोक घोसरवाडे, प्रताप पाटील, बाजीराव चव्हाण, नारायण पाटील, शंकर जाधव यांच्यासह शंभरहून अधिक सभासदांनी सहभाग घेतला. अहवाल सालात संस्थेस सौरऊर्जा प्रकल्प, धान्य विभाग, खत विभाग, गिरण विभाग, यामधून १२ लाख नफा झाला असून संस्थेच्या सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. तसेच उच्चांकी लाभांश जाहीर केल्याबद्दल व संस्थेचा कारभार पारदर्शक केल्याबद्दल सर्व संचालक व कर्मचारी यांचे कौतुक करण्यात आले. अहवाल वाचन सचिव कृष्णात जाधव यांनी केले.
या वेळी सभेचे अध्यक्षस्थानी बाळासाहेब मेडसिंगे, उपाध्यक्ष पांडुरंग कुरुकले, संभाजी मगदूम, अनिल भंडारी, काशिनाथ घोसरवाडे, जीवाजी पाटील, सखाराम चव्हाण, महेश वळ्ळगड्डे, महादेव मेडसिंगे यांच्यासह संस्थेचे सर्व सदस्य कर्मचारी उपस्थित होते.