कोल्हापूर : बेळगाव महानगरपालिकेसमोरील लाल पिवळा ध्वज त्वरित हटवावा तसेच मराठी भाषिकांवरील अत्याचार थांबवावेत अन्यथा शनिवारी (दि. २०) एक दिवसांसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील कन्नड व्यावसायिकांचे व्यवसाय बंद केले जातील, असा इशारा शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
सीमा भाग केंद्रशासित प्रदेश करावा अशी सूचना शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यापासून भाजप पुरस्कृत कन्नड रक्षण वेदिका संघटनेचे कार्यकर्ते आणि कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर अत्याचार करत आहेत. त्यामुळे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे देवणे व पवार यांनी सांगितले.
मराठी भाषिक तरुणांवर पोलीस ठाण्यातून खोटे गुन्हे दाखल करत आहे. आंदोलने चिरडून टाकत आहेत. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बेळगाव जिल्ह्यात बंदी घालत आहेत. भाषिक तेढ निर्माण केल्याचे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. हे जर थांबले नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन छेडले जाईल, असे देवणे यांनी सांगितले
यावेळी उपप्रमुख सुजित चव्हाण, बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, संपर्कप्रमुख अरविंद नागनूर, प्रवीण तेजब, सचिन गोरले उपस्थित होते.
एक दिवसांसाठी असे असेल आंदोलन..
कन्नड लोकांचे व्यवसाय, दुकाने, हॉटेल्स, बांधकामे, वाहतूक बंद पाडणार.
कर्नाटकातून येणारी एस.टी. वाहतूक, खासगी वाहने बंद
कन्नड व्यावसायिकांनी दुकाने, हॉटेल्स सुरूच ठेवली तर शिवसेना स्टाइलने बंद पाडू
-गृहमंत्री अमित शहांना पत्र-
सीमा भागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत चर्चा करण्यासाठी वेळ द्यावी म्हणून गृहमंत्री अमित शहा यांना शिवसेनेचे खासदार नितीन राऊत यांच्यामार्फत पत्र देण्यात आले आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्यामार्फत महाराष्ट्र विधीमंडळाचे अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना निवेदन देण्यात आले असून, त्यामध्ये महाराष्ट्र व कर्नाटक शासनाच्या मुख्य सचिवांची संयुक्त बैठक घेण्याची मागणी करण्यात आली आहे.