नृसिंहवाडी : येथे आज, गुरुवार दुपारपासून कन्यागत महापर्वकाल पालखी सोहळ्यास सुरुवात होत आहे. गुरू हा ग्रह कन्या राशीला आल्यावर श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्वकालास आरंभ होणार असून, हा पर्वकाल वर्षभर चालणार आहे. या सोहळ्यात महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, आदी राज्यांतून लाखो भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. दत्तभक्त व भाविकांना विविध सोयी व सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत आणि दत्त देव संस्थान सज्ज झाले आहे.मुख्य मंदिर पाण्याखाली असले तरी पालखी सोहळा आणि कन्यागत पर्वकालाचे कार्यक्रम होणार असल्याचे अध्यक्ष राहुल पुजारी व सचिव संजय उर्फ सोनू पुजारी यांनी सांगितले.दत्त मंदिरात गुरुवारी पहाटे पाच वाजता काकडआरती व षोडशोपचार पूजा झाल्यावर रूद्र एकाशिनी होईल. सकाळी आठ ते अकरा यावेळेत अभिषेक पूजा होऊन, अकरा वाजता श्रींची महापूजा होईल. नैवेद्य, धूप, दीप, आरती होऊन दोनच्या सुमारास श्रींच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. श्रींची पालखी प. पू. श्री नारायण स्वामी मंदिरासमोरून प. पू. रामचंद्रयोगी स्वामी महाराज यांच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून मुख्य सभा मंडप, पेठ भाग, ग्रामपंचायत, मरगुबाई मंदिर, ओतवाडी या मार्गे शुक्लतीर्थ या ठिकाणीमुक्कामासाठी रात्री उशिरा पोहोचेल.नृसिंहवाडीतील पालखी मार्गावरील नागरिकांनी घराला रंगरंगोटी, केळीचे खुंट, धार्मिक वचनांचे डिजिटल बोर्ड व सुशोभीकरण केले आहे. त्यामुळे गावात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षेसाठी पोलिस, एन.डी.आर.एफ.चे जवान, महाविद्यालयाचे स्वयंसेवक, व्हाईट आर्मी, अनिरुद्ध उपासना केंद्र, एन.सी.सी.चे विद्यार्थी, आदी तैनात केले आहेत. भाविकांसाठी जादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे.दत्त देव संस्थानमार्फत दर्शनरांग, सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत दोन ठिकाणी मोफत महाप्रसाद, संपूर्ण पालखी मार्गावर व शुक्लतीर्थ ठिकाणी भव्य मंडप, पिण्याचे शुद्ध पाणी, मुखदर्शन, आदी अनेक सोयी-सुविधा तसेच ग्रामपंचायतीमार्फत पार्किंग, फेरीवाल्यांसाठी मार्किंग, दिवाबत्ती, स्वच्छता अशा विविध सोयी व सुविधा करण्यात आल्याचे दत्त देव संस्थानचे अध्यक्ष राहुल पुजारी व सेक्रेटरी सोनू ऊर्फ संजय पुजारी, सरपंच सौ. अरुंधती जगदाळे, उपसरपंच धनाजीराव जगदाळे यांनी सांगितले व कन्यागत पर्वकाल सोहळ्याची सुरुवात उत्साहात होईल, असा विश्वास व्यक्त केला.
कन्यागत महापर्वकाळचा पालखी सोहळा आजपासून
By admin | Published: August 11, 2016 1:08 AM