कोल्हापूर : ग्रामीण महाराष्ट्राची परंपरा जपत वारकरी साहित्य परिषद आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ‘स्वच्छतेचा महाजागर’ हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषदकोल्हापूर अंतर्गत या कार्यक्रमाची नियोजन बैठक सोमवारी जिल्हा परिषदेत झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, वारकरी साहित्य परिषदेच्या मालुश्री पाटील उपस्थित होत्या.राज्याच्या ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्या सहभागातून ‘स्वच्छ भारत मिशन ग्रामीण’ हा ध्वजांकित कार्यक्रम राबविला जातो.
या कार्यक्रमांतर्गत सद्य:स्थितीस उपलब्ध सुविधांचा नियमित वापर, ग्रामीण कुटुंबांकडून स्वच्छता सवयींचा अंगीकार, वैयक्तिक स्वच्छता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी या विषयांवर गावातील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, महिला यांचे प्रबोधन करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रवचनकारांच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.या प्रबोधनासाठी जिल्ह्यातील ६० प्रवचनकारांची निवड राज्यस्तरावरून करण्यात आली आहे. प्रत्येक प्रवचनकाराने २४ ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेबाबत प्रबोधन करावयाचे आहे. २६ जानेवारीला जिल्हास्तरावर या कार्यक्रमाचा प्रारंभ होणार आहे. यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विजय पाटील उपस्थित होते.